काताळे (ता. गुहागर) गावात श्रीभैरी, कालकी, चंडकी ग्रामदेवतांचा शिमगोत्सव उत्साहात साजरा होणार

आबलोली : गुहागर तालुक्यातील काताळे गावातील श्रीभैरी, कालकी, चंडकी या ग्रामदेवतांचा शिमगोत्सव सालाबादप्रमाणे यावर्षीही विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असून मुंबई आणि गावातील लहान, थोरांपासून महिला – पुरुषांच्या आनंदाला उधाण आले आहे.
कोकणात प्रत्येक गावागावातील ग्रामदेवताच्या पालख्या सजल्या असून संपूर्ण कोकण भक्तीमय आनंदीमय झाले आहे, यात गुहागर तालुक्यातील काताळे गावातील ग्रामदेवता श्रीभैरी, कालकी, चंडकी या ग्रामदेवतेंच्या शिमगोत्सवाला १२ मार्चपासून प्रारंभ करण्यात आला आहे. संपूर्ण १० दिवसांचा कार्यक्रम श्रीभैरी, कालकी, चंडकी ग्रामदेवता ट्रस्ट काताळे व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आला असून सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते गणेश अरुण कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
११ मार्च रोजी सकाळी श्रीभैरी, कालकी, चंडकी ग्रामदेवतेंच्या देवळात देवाची रूपे लावण्याचा कार्यक्रम गावकरी, मानकरी, वाडीप्रमूख ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. १२ मार्च रोजी सकाळी ७ वाजता त्रयोदशीचा पहिला होम लागल्यानंतर पालखी सहाणेवर स्थानापन्न झाली.

दिनांक १३ मार्च रोजी सकाळी ८ पालखी सहाणेवरून निघेल व १० वाजता कोंडाचा भैरी देव येथे पौर्णिमेचा होम लावून पालखी पुन्हा सहाणेवर स्थानापन्न होईल. दिनांक १४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पालखी सहाणेवरून निघेल व सकाळी १० वाजता सोमनाथ मंदिर येथे धुळीवंदनाचा होम लावून पालखी हळदीकुंकू समारंभासाठी गावचे खोत अरुण कदम यांच्या निवासस्थानी जाईल. हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पालखी सहाणेवर स्थानापन्न होईल.
दिनांक १५ मार्च रोजी सकाळी १० वाजता दिवाकरवाडीचे ग्रामस्थ यांच्या पुजेला सुरुवात होईल. दिनांक १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता कदमवाडीचे ग्रामस्थ यांच्या पुजेला सुरुवात होईल. दिनांक १७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मावळतवाडीचे ग्रामस्थ यांच्या पुजेला सुरुवात होईल. दिनांक १८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता नवानगर, लोहारवाडी, तेलीवाडीतील ग्रामस्थ यांच्या पुजेला सुरुवात होईल. दिनांक १९ मार्च रोजी सायंकाळी ४ श्री सत्यनारायणाच्या महापुजेला सुरुवात होईल. सायंकाळी ७ वाजता महाआरती होऊन रात्री ८ वाजता प्रासादिक भजन त्यानंतर रात्री १० वाजता बहुरंगी बहूढंगी नमनाचा कार्यक्रम संपन्न होईल. दिनांक २० मार्च रोजी सकाळी १० वाजता पालखी सहाणेवरून निघेल व भराड्यावर स्थानापन्न होईल. नैवद्य झाल्यावर पालखी भराड्यावरून वाजतगाजत देवळात जाईल. त्यानंतर देवाची रूपे उतरवून शिमगोत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.
या संपूर्ण शिमगोत्सव कार्यक्रमाचे आयोजन श्रीभैरी, कालकी, चंडकी ग्रामदेवता ट्रस्ट काताळे व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले असून सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते गणेश अरुण कदम यांनी केले आहे.



