मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांच्या १३ हजार बाप्पांचे विसर्जन

रत्नागिरी : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे सांगत अत्यंत भावपूर्ण वातावरणात जिल्ह्यातील १३ हजार ४० घरगुती, तर ६ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विधिवत पूजन, आरती व नैवेद्य दाखवून बाप्पाचा पाहुणचार घेतल्यानंतर दुपारनंतर विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. बाप्पाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांत विरहाचे अश्रू तर चेहऱ्यावर पुढील आगमनाची आतुरता स्पष्टपणे जाणवत होती.

रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध मांडवी समुद्रकिनाऱ्यावर सायंकाळच्या सुमारास गणेशभक्तांनी विसर्जनासाठी गर्दी केली होती. अनेक खासगी वाहनांतून पारंपरिक वाद्यांच्या तालावर वाजतगाजत बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढली. मांडवी किनाऱ्यासह शहरानजीकचा भाट्ये समुद्रकिनारा आणि पांढरा समुद्र या मुख्य विसर्जन स्थळांवर दुपारनंतर भाविकांचा सुरू होता. रत्नागिरीसह खेड, चिपळूण, राजापूर, दापोली आणि लांजामध्येही विसर्जन सोहळा अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध रीतीने संपन्न झाला.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक नगरपालिका आणि पोलिसांच्या वतीने किनारपट्टीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. किनारपट्टी भागात स्थानिक जीवरक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन पथके पूर्ण तयारीनिशी सज्ज होती. विसर्जन मार्गांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!