पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची भेट

चिपळूण : चिपळूण, खेड नगरपालिका आणि गुहागर नगर पंचायत निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. त्याबद्दल शिवसेना उपनेते, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे अतिथी सभागृहात चिपळूण व गुहागर निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची, तर खेड येथे एसटी स्टँडजवळील महायुती निवडणुक प्रचार कार्यालयात भेट घेत शुभेच्छा दिल्या.
यावेळी पालकमंत्री सामंत यांनी नगराध्यक्ष आणि उमेदवारांना नागरिकांना अभिप्रेत असलेली विकासकामे करण्याची सूचना केली.
चिपळूण येथे झालेल्या कार्यक्रमाला रोहयो मंत्री भरत गोगावले, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार संजय कदम, गुहागरचे राजेश बेंडल, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, भाजपाचे प्रभारी नेते प्रशांत यादव उपस्थित होते.
या कार्यक्रमात चिपळूण नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी विजयी झालेले उमेश सपकाळ, नवनियुक्त नगरसेवक उदय जुवळे, रूपाली दांडेकर, प्रमोद बुरटे, निहार कोवळे, वैशाली निमकर, संदीप भिसे, हर्षाली पवार, अंजली कदम, शशिकांत मोदी, रसिका देवळेकर, विक्रांत शिर्के, नीलम जाधव, अंकुश आवळे, शुभम पिसे, गणेश आंग्रे, पल्लवी महाडिक यांचा सन्मान करण्यात आला.
खेड नगरपालिका निवडणुकीत महायुतीने २१-० असा ऐतिहासिक व एकतर्फी विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली. त्याबद्दल पालकमंत्री सामंत यांनी विजयोत्सव साजरा केला.
खेड येथे झालेल्या विजयोत्सवावेळी रोहयो मंत्री भरत गोगावले, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार संजय कदम, माजी सभापती अण्णा कदम उपस्थित होते. या वेळी नवनियुक्त नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला, नगरसेवक वर्षा सापटे, निकेतन पाटणे, दीप्ती शिगवण, नीता आमरे, सुनील दरेकर, अंजून कुर्णे, तौसिफ खोत, यश खेडेकर, आरती पवार, सतीश चिकणे, स्वप्नील सैतवडेकर, स्वप्नाली चव्हाण, प्रेमळ चिखले, संजना कुडाळकर, रसिका खेडेकर, भूषण चिखले, रेश्मा खतीब, आरिफ मुल्ला, रहिम साहिबोले, वैभवी खेडेकर यांचा सन्मान करण्यात आला.



