क्रीडामुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जेमिमा रोड्रिग्जचा जबरदस्त शतकवीर झंझावात!

महिला टीम इंडिया वर्ल्ड कप फायनलमध्ये दाखल

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईमध्ये काल रात्री एकच आवाज घुमला — “भारत! भारत!” कारण त्याला कारणीभूत ठरली भारतीय संघाची स्टार फलंदाज जेमिमा रोड्रिग्ज. पहिल्या दोन विकेट झटपट गमावल्यानंतर चाहत्यांची धाकधुक वाढली होती, पण जेमिमाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने संघाला विजयाच्या दिशेने नेले.

हरमनप्रीत कौरने ८९ धावांची आकर्षक आणि दमदार खेळी करत संघाला स्थिरता दिली. मात्र, तिच्या बाद झाल्यानंतर जबाबदारी जेमिमाच्या खांद्यावर आली आणि ती खऱ्या अर्थाने सामन्याची नायिका ठरली. तिने केवळ टिकाव धरला नाही, तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर धुवांधार फटकेबाजी करत नाबाद १२७ धावा झळकावल्या.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३३९ धावांच्या आव्हानाचा भारताने केवळ पाच गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पाठलाग केला आणि शानदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिला संघाने तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

या पराभवानंतर माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर जावे लागले असून, यंदाचा विश्वचषक विजेता नवीन संघ ठरणार आहे. आता भारताची फायनलमध्ये गाठ दक्षिण आफ्रिकेशी पडणार असून, हा ऐतिहासिक सामना २ नोव्हेंबर रोजी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे.

भारतीय संघाच्या या दमदार कामगिरीमुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर “जय हो टीम इंडिया!” असा जयघोष करत या विजयानंतरचा आनंद साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!