राजापूर नगरपालिकेच्या १५० वर्षानिमित्त १५ ऑगस्टला भव्य मॅरेथॉन स्पर्धा
पुरुष, महिला व १४ वर्षांखालील मुला-मुलींसाठी स्वतंत्र गट; १ ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन

राजापूर : नगरपालिकेच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राजापूर नगरपालिकेतर्फे १५ ऑगस्ट रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि क्रीडाविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही मॅरेथॉन स्पर्धा राजापूर शहरातील जवाहर चौक ते शीळ पावस्कर घर या मार्गावर होणार आहे. पुरुष गटासाठी ५ किलोमीटर, महिला गटासाठी ३ किलोमीटर, तर १४ वर्षांखालील मुला-मुलींसाठी १ किलोमीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
पुरुष गटातील विजेत्यांना प्रथम तीन क्रमांकासाठी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. महिला गटात प्रथम तीन क्रमांकासाठी अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये, तर १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटातही प्रथम तीन क्रमांकास अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
स्पर्धेची माहिती देण्यासाठी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी स्पर्धेची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष विनय गुरव, पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, शिवसेना गटनेते ॲड. राहुल तांबे यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी १ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन (गुगल फॉर्मद्वारे) अथवा ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. राजापूर नगरपालिकेच्या दीडशे वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा उत्सव आणि स्वातंत्र्य दिनाचा उत्साह यांचा संगम असलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी केले.



