मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागर मराठी भाषा मंडळातर्फे मार्गदर्शन व प्रश्नमंजुषा उपक्रम

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे मराठी भाषा पंधरवडा उपक्रम व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक गटात प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. तसेच इयत्ता दहावी मराठी विषयबाबत महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष व मराठी भाषातज्ञ विजयकुमार नारायण लांडगे यांचे विशेष मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ नुकताच पाटपन्हाळे विद्यालयात उत्साहात झाला.

प्रश्नमंजुषा स्पर्धेतील प्राथमिक गटात दुर्वा दशरथ नाटेकर (गुहागर विद्यालय) व माध्यमिक गटात हर्षाली दत्ताराम काताळकर (तात्या वझे पाचेरी आगर विद्यालय) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक संपादन केला.

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. एस. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्वागत समारंभ नुकताच झाला. यासाठी महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष व मराठी विषयतज्ञ विजयकुमार लांडगे, गुहागर तालुका मराठी भाषा मंडळाचे माजी अध्यक्ष व वाघांबे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक ए. एस. जोशी, मुख्याध्यापिका एस. एस. चव्हाण, गुहागर मराठी भाषा मंडळाचे अध्यक्ष एस. बी. चांदिवडे, गुहागर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम. डी. गोरीवले, मराठी भाषा मंडळाचे उपाध्यक्ष पी. बी. जाधव, पालपेणे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आर. जी. मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, श्रीशारदा माता व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचे व संघटनेच्या उपस्थित पदाधिकारी शिक्षकवृंदांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागरचे माजी अध्यक्ष व वाघांबे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एस. एस. जोशी यांचा मराठी भाषा मंडळ संघटनेतर्फे शिक्षक सेवा निवृत्तीबद्दल कार्यक्रमाध्यक्षांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. इयत्ता दहावी मराठी विषयाचे मार्गदर्शक वि. ना. लांडगे यांचा मराठी भाषा मंडळातर्फे सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानित मान्यवरांनी गुहागर तालुका मराठी भाषा मंडळाचे राबवले जाणारे उपक्रम व योगदानाबाबत अभिनंदन करून सन्मान केल्याबद्दल धन्यवाद दिले.

मराठी भाषातज्ञ व मार्गदर्शक वि. ना. लांडगे यांनी उपयोजित लेखनबाबत प्रश्नपत्रिकातील गुणांचा तपशील, विद्यार्थ्यांनी गुण वाढवण्यासाठी करावयाचे प्रयत्न, उत्तर पत्रिका कशा पद्धतीने तपासल्या जातात, मराठीचा पेपर लिहिताना रचना सौंदर्य व भाव सौंदर्याला महत्त्व, लेखन व्यवहार ज्ञान करणे महत्त्वाचे, पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात, बातमी लेखन, कथा व निबंध लेखन, आदर्श उत्तर पत्रिका नमुना, लेखनात नाविन्यता किंवा वेगळेपणा कसा असावा, मराठीचे व्याकरणदृष्ट्या करावयाचे लेखन, उत्तर पत्रिका लिहिताना विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या चुका व दुर्लक्ष आदी महत्त्वाच्या मुद्द्यांनुसार तंत्रज्ञान सादरीकरणाने व फलक लेखनाने उत्तमरीत्या मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. इयत्ता दहावी मार्गदर्शनाबाबत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

द्वितीय सत्रात गुहागर तालुका मराठी भाषा मंडळातर्फे मराठी भाषेचे संवर्धन व जतन, मराठी भाषेचे महत्त्व, मराठी भाषा पंधरवडा उपक्रम व मराठी भाषा गौरव दिन आदी उद्देशाने गुहागर तालुकास्तरीय प्राथमिक – इयत्ता पाचवी ते सातवी व माध्यमिक – इयत्ता आठवी ते दहावी गटात मराठी विषयाबाबत प्रश्नमंजुषा स्पर्धा झाली. प्राथमिक व माध्यमिक गटात बहुसंख्य विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.

प्राथमिक गटात दुर्वा दशरथ नाटेकर (गुहागर विद्यालय) हिने प्रथम क्रमांक, मिहीर समीर पुरोहित (पाटपन्हाळे विद्यालय) द्वितीय क्रमांक, आरुषी सचिन भेकरे (जामसूत विद्यालय) तृतीय क्रमांक पटकावला. निषाद दिनेश भरणकर (एक्सलंट अकॅडमी आबलोली विद्यालय) व लावण्या संतोष पांचाळ (आबलोली विद्यालय) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक संपादन केला. तसेच माध्यमिक गटात हर्षाली दत्ताराम काताळकर (तात्या वझे पाचेरीआगर विद्यालय) याने प्रथम क्रमांक, स्वरा संतोष लांजेकर (मुंढर विद्यालय) हिने द्वितीय क्रमांक, तनुश्री नोमेश कारेकर (तळवली विद्यालय) हिने तृतीय क्रमांक पटकावला. विदिशा प्रदीप जाधव (गुहागर हायस्कूल) व यश लक्ष्मण हुमणे (माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक संपादन केला. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील गुणवंत व सहभागी विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभासाठी कार्यक्रमाध्यक्ष व मराठी भाषा मंडळाचे अध्यक्ष एस. बी. चांदिवडे, गुहागर पंचायत समिती शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी एम. एस. वळवी, गुहागर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम. डी. गोरीवले, मुख्याध्यापिका एस. एस. चव्हाण, मुख्याध्यापक ए. एच. साठे तसेच संघटनेचे पदाधिकारी शिक्षक मान्यवर म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक चषक, प्रमाणपत्र, शालेयपयोगी भेटवस्तू व पुष्पगुच्छ तसेच सहभाग प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी एम. एस. वळवी यांनी गुहागर मराठी भाषा मंडळातर्फे राबवले जाणारे दर वर्षाचे विविध उपक्रम, स्पर्धात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे आदी मुद्द्यांनुसार आयोजक, मार्गदर्शक, गुणवंत व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाध्यक्ष व मराठी भाषा मंडळाचे अध्यक्ष श्री. चांदिवडे यांनी उपस्थित मान्यवर, सर्व सहभागी विद्यालये व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक तसेच पाटपन्हाळे हायस्कूलच्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. मराठी विषयाबाबत प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा फायदा , विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांमुळे निर्माण होणारी अभ्यासूवृत्ती आदी मुद्द्यांबाबत मार्गदर्शन केले. तनुश्री नोमेश कारेकर व मिहीर सामी पुरोहित या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

कायक्रमाचे सूत्रसंचालन मराठी भाषा मंडळ गुहागरचे सचिव व पाटपन्हाळे विद्यालयाचे मराठी विषय शिक्षक एस. एम. आंबेकर यांनी केले. पी. बी. जाधव यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!