मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागरच्या सरस महोत्सवात लाल मातीतील जाखडी गायक, कलाकारांनी उडवली धमाल

आबलोली (संदेश कदम) : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान, जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर येथे आयोजित केलेल्या सरस महोत्सवाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमात पंचायत समिती गुहागर आणि उमेद अभियान अंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून बचत गटांचे ३७ स्टॉल विक्रीसाठी उपलब्ध होते. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमही उत्साहात झाले. यावेळी डोंबिवली येथे आगरी महोत्सवात गाजलेला गुहागर तालुक्यातील श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळ जामसुत जांभुर्णेवाडी या ग्रामीण भागातील लाल मातीतील गायक आणि कलाकारांचा जाखाडी नृत्याचा जबरदस्त कार्यक्रम झाला. या जाखडी नृत्यांनी धम्माल उडवून दिली.

पंचायत समिती गुहागरचे बीडीओ शेखर भिलारे, उमेदच्या तालुका अभियान व्यवस्थापक दुर्वा ओक, राहिला बोट यांनी आणि गुहागर वाशी यांनी याच व्यासपीठावर कार्यक्रम करण्यासाठी संधी दिली. श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळ जामसुत, जांभुर्णेवाडी मंडळाचे जाखडी नृत्याचे शाहीर अशोक कुंभार यांनी “शाहिर मानाचा मुजरा करतो” या गाण्याने जबरदस्त सुरुवात केली. त्यानंतर “आज तुझे आम्ही गोड नाम घेतो पडतो तुझ्या पाया”, “जय गणराया वंदितो पाया” गणरायाची प्रार्थना करून गणरायाच्या नामाचे आणि गुणांचे वर्णन झाले. “गणा धावना.. गणा.. धावना.. धावना.. अंगणा” शाहीर अशोक कुंभार यांच्या गाण्याने धमाल उडून गेली. त्यानंतर प्रार्थना झाली, गण झाला आणि शक्ती तुऱ्यांच्या नियमाप्रमाणे सह. शाहीर महेश जामसूतकर यांनी “यमुना तीरी, वाजवी बासरी”, “आला आला नंदाचा श्रीहरी” ही गवळण सादर केली

त्यानंतर शाहीर अशोक कुंभार यांनी सरस महोत्सवावर “गुहागर तालुका आहे सुंदर गाव पहा नकाशात शोभते नाव, एक मनाचा, प्रेम पणाचा आहे म्हणे प्रेम भाव” या गाण्याने धमाल उडून दिली.

त्यानंतर “महाराष्ट्राच्या दऱ्या, खोऱ्यातून गाजविली तलवार..” हे गाणे सह गायक महेश जामसुतकर यांनी सादर केले. हे गाणे चालू असतानाच प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शनही घडविले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार करण्यात आला. या जाखडी नृत्यात श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळ जामसुत जांभुर्णेवाडी या मंडळाचे शाहीर अशोक कुंभार, सह शाहीर सुधीर जामसूतकर, सह शाहीर महेश जामसुतकर यांच्यासह जाखडी नृत्य कलाकार पार्थ जामसुतकर, आदित्य जामसुतकर, गीतेश शिरकर, ओंकार जामसुतकर, अजित जामसुतकर,अंकुश कुंभार, दिलीप शिरकर आणि सुधीर जामसुतकर, ढोलकी वादक शुभम जामसूतकर, विनेश शिरकर, झांज वादक एकनाथ जामसुतकर, कोरस दत्ताराम कोळथरकर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सोहम जामसुतकर यांनी उत्कृष्टपणे सांभाळली.

मावळ्यांच्या भूमिकेत शंकर कोळथरकार, श्रीरंग जामसुतकर यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली साऊंड आणि लायटिंग अनिल कुंभार तसेच फोटोग्राफर सुरज कोळथरकर आणि या संपूर्ण जाखडी नृत्य कार्यक्रमाचे नीटनेटके सूत्रसंचालन सुनील गुडेकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!