रत्नागिरी जिल्ह्यात उद्या सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रत्नागिरी : हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, अनेक भागांत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. विशेषतः खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, अतिवृष्टीमुळे उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून मंगळवार, ७ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका, सरकारी, खाजगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा तसेच सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ तसेच शासनाच्या संबंधित परिपत्रकानुसार जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



