मुख्य बातमी

सौ. दिशा भाटकर यांनी पटकावला “श्रावण स्मार्ट सखी २०२५”चा किताब

उदय सामंत प्रतिष्ठानतर्फे आयोजन

रत्नागिरी : उदय सामंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्रावण स्मार्ट सखी २०२५ या स्पर्धेत प्राथमिक फेरीत निवड झालेल्या २१ जणींची अंतिम फेरी १० ऑगस्ट रोजी झाली. यात सौ. दिशा भाटकर यांनी स्मार्ट श्रावणसखी २०२५ हा किताब पटकावला. सौ. अनघा नाचणकर पहिली उपविजेती, तर सौ. विजेता मोर्ये यांनी दुसरी उपविजेती होण्याचा मान मिळवला. या शिवाय सौ. दीपिका कुबल यांना उत्तम व्यक्तिमत्व, सौ. सौम्या घुडे यांना उत्कृष्ट पेहराव, सौ. योगिता खांडेकर यांना मोहक हास्य, सौ. कुमुदिनी शेट्ये यांना उत्तम ज्येष्ठ व्यक्तिमत्व अशी विशेष परितोषिके देण्यात आली.

केवळ दोन दिवसांच्या कालावधीत या महिलांनी वेशभूषा, स्टेजवरील वावर, संवाद कौशल्य यावर मेहनत घेतली. प्रतिष्ठानच्या वतीने या तयारीसाठी काही सेशन्सचे आयोजन केले होते. खूप मेहनत घेऊन तयार झालेल्या या २१ सख्या अंतिम फेरीत वावरताना त्यांच्यातला आत्मविश्वास वाखाणण्यासारखा होता. पहिल्या फेरीत महाराष्ट्राची शान असलेल्या मराठमोळ्या वेशभूषेतल्या या सख्या पाश्चात्य ठेक्यावरही तितक्याच सहजतेने स्टेजवर वावरल्या. यानंतरची दुसरी कौशल्य फेरी ही त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देणारी होती. कोणी नृत्य सादर केले, कोणी गीत सादर केले, कोणी अभिनय सादर केला तर कोणी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. आपल्यातली कला सादर करताना त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान खूप काही सांगून गेले.

तिसऱ्या फेरीमध्ये परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतानाही या महिलांच्या चेहेऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या भेट वस्तूसह अमेय ज्वेलर्सकडून एक नेकलेस, जी. के. कॉस्मेटिक्सकडून एक गिफ्ट हॅम्पर देण्यात आले. तसेच सहकार बोर्डचे अध्यक्ष, रत्नागिरी व्यापारी संघटनेचे मार्गदर्शक हेमंत वणजू यांनी दिवाळी शॉपिंग फेस्ट २०२५ च्या उद्घाटनाचा मान हा या स्पर्धेतील पहिल्या ३ विजेत्या महिलांना देणार असल्याचे घोषित केले.

या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनात दिलसे क्रिएशनचे सिद्धेश बंदरकर, दीपक पवार, प्रथमेश साळवी, अभिजीत दुडे, स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या ॲड. निलोफर खान, ध्वनी व्यवस्था पाहणारे श्री. होरंबे, फोटोग्राफर कांचन मालगुंडकर, सातत्याने साफसफाईकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून असणारा नाट्यगृहाचा संपूर्ण स्टाफ यांच्यासह शिवसेनेच्या शहर महिला आघाडीच्या प्रमुख सौ. स्मितल पावसकर, जिल्हाप्रमुख सौ. शिल्पा सुर्वे, सौ. पूजा पवार, सौ. श्रद्धा हळदणकर, सौ. कौसल्या शेट्ये, सौ. वैभवी खेडेकर, सौ. दिशा साळवी, सौ. ऋतुजा देसाई, सौ. प्रिया साळवी, सौ. सुहासिनी भोळे, सौ. रूपाली नागवेकर, सौ.अनिशा डोंगरे या महिला पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

तसेच कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात दीक्षा मांडवकर, रिया मांडवकर, श्रावणी राऊत, सानिया दळवी, वेदिका चव्हाण, उत्कर्षा नाचणकर, वैष्णवी खंडारे, सेजल कीर, शिवानी पवार, सेजल शिंदे, मनस्वी नागवेकर यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेचे परीक्षण ॲड. समृद्धी मयेकर आणि डॉ. अनुराधा लेले यांनी केले. सौ. पूर्वा पेठे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पालकमंत्री पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे विशेष आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!