मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

महामार्ग चौपदरीकरणातील प्रलंबित कामांना गती द्या

आ. निलेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. आता पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला असून कामाला गती देण्याबरोबरच अन्य कामे देखील लवकरच पूर्णत्वास गेल्याच पाहिजेत याची कल्पना ठेकेदाराला स्पष्ट भाषेत द्या, अशी सूचना आ. निलेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. २९ मार्च रोजी चिपळूण आले असता आ. निलेश राणे यांनी यांनी महामार्गाच्या कामाची माहिती घेतली.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपरीकरण व्हावे, यासाठी निलेश राणे यांनी खासदारकीच्या कालखंडात केंद्र शासनाकडे मागणी केली होती व तसा सातत्यपूर्ण पाठपुरावा देखील केला होता. तर दुसरीकडे जनतेसह पत्रकारांनी देखील सातत्याने आवाज उठवला होता. याची दखल घेऊन गेल्या काही वर्षांपूर्वी या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. तर गेल्या वर्षी रत्नागिरी-सिंधदुर्गचे खासदार म्हणून माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडून आल्यानंतर त्यांनीही या प्रश्नात जातीने लक्ष दिले असून त्यांचे या कामाकडे लक्ष आहे. मात्र, या महामार्गाचे काम अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही. दरम्यान, बहादूरशेखनाका येथे सुरू असलेल्या पुलाचा काही भाग कोसळण्याची घटना घडली. तसेच परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली. पावसाळ्यात तर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. चिपळूण शहरात ओव्हर ब्रीजचे काम सुरू असताना कामगार जमिनीवर कोसळून जखमी झाले होते. परशुराम घाटात रस्ता खचण्याची घटना घडलीदेखील होती. एकंदरीत यासारख्या घटना घडत आहेत. तसेच शहरात देखील काही समस्या उद्भवत आहेत. या अनुषंगाने माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी आ. निलेश राणे यांना या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली होती.

दरम्यान, आ. निलेश राणे शनिवारी चिपळूणमध्ये आले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये चिपळूण शहरातून जाणाऱ्या ओव्हर ब्रिजचे जे काम सुरू आहे, ते धीम्या गतीने सुरू आहे. तरी या संदर्भात ठेकेदाराला समज देऊन ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे. तसेच परशुराम घाटामध्ये नेहमीच अपघाताच्या घटना घडत आहेत. या संदर्भात उपाय योजना करण्याबाबत ठेकेदाराला सांगण्यात यावे. याचबरोबर चिपळूण शहरातील पॉवर हाऊस येथे नेहमीच अपघाताच्या घटना घडत आहेत.

या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे सांगितले.

यावर राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूणचे अधिकारी नजीम मुल्ला व श्री. खुणेकर यांनी डिसेंबर २०२५ पूर्वी बहुतांश कामे पूर्ण होतील, असे आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, आशिष खातू, भाजपा शहर उपाध्यक्ष महेश कांबळी, प्रफुल्ल पिसे, शुभम पिसे, सुधीर पानकर, अभिषेक जागुष्टे, हरिश्चंद्र रहाटे, शौर्य निमकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!