कुवारबाव येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे हार्ट फुलनेस ध्यान योग शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : संस्कृती मंत्रालय भारत सरकार आणि श्री रामचंद्र मिशन हार्टफुलनेस यांच्या सहकार्याने कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ७ ते ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता या वेळेत हाऊसफुलनेस ज्ञानयोग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष मारुती अंबरे यांनी केले आहे.
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या ३१ मार्च रोजी झालेल्या मासिक स्नेहमेळाव्याच्या प्रसंगी हार्टफुलनेस मिशनचे प्रशिक्षक डॉ. सुधीर आकोदकर यांनी योग आणि हृदयावरील ध्यान कसे करावे याचे प्रात्यक्षिका सहित मार्गदर्शन केले. या हार्टफुलनेस ध्यानामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे संवर्धन होऊन निरोगी सुदृढ आणि संतुलित आनंदी व्यक्तिमत्व विकसित होते हा या शिबिराचा मोठा लाभ आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या स्नेहमेळाव्यात मार्च महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा शुभेच्छा पत्र आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .त्यानंतर संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक वसंत पटवर्धन आणि प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कासेकर यांनी रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयात आता नेत्रदान आणि देहदान सुविधा उपलब्ध झाली असल्याने ज्येष्ठांनी श्रेष्ठ दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
कुवारबाव संघाचे आधारस्तंभ माजी कार्यवाह नारायण महादेव नानिवडेकर आणि प्रभाकर एकनाथ भाटकर या दोन ज्येष्ठ सदस्यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाल्याने या मेळाव्यात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्यामसुंदर सावंत देसाई यांनी संघाच्या वाटचालीचा आढावा सादर केला.
यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र कदम, ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर देवस्थळी, डॉ. मनोहर चांडगे, खजिनदार मुकुंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. शेवटी कार्यवाह सुरेश शेलार यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने मेळाव्याची सांगता करण्यात आली.



