मुख्य बातमी

गणपतीपुळ्यात आजपासून जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री 

रत्नागिरी : ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २८ डिसेंबर या कालावधीमध्ये श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या (२४ डिसेंबर) रोजी सकाळी ११ वाजता उद्योगमंत्री उदय सामंत व गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय सरस विक्री व प्रदर्शन हे ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाते. या प्रदर्शनामाध्ये जिल्ह्यातील एकूण ७५ बचत गट सहभागी होणार आहेत. यामध्ये ६० उत्पादनांचे स्टॉल व १५ फूड स्टॉल असणार आहे. यामध्ये १०७ स्वयंसहायता समूह, ४ महिला शेतकरी व उत्पादक कंपन्या व १ उद्योग विकास केंद्र यातील महिला सहभागी होणार आहेत.

प्रदर्शनामध्ये स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू (बुरुड काम, गोधडी, लोकरीच्या विणकाम केलेल्या वस्तू, क्रेयॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी आदी) विविध प्रकारचे घरगुती मसाले (मच्छी मसाले, मटण मसाले) पिठे, पापड (नाचणी, उडीद, लसूण, सोयाबीन, पालक, बीट, टोमॅटो, पोह्याचे, ओव्याचे आदी), लोणची (आंबा, लिंबू, मिरची, आवळा, करवंद आदी) कोकम, आगळ, कोकणी मेवा (काजूगर, काजू मोदक, आंबावडी, आमरस, आंबापोळी आवळा मावा, फणसपोळी, करवंद चडी, तळलेले गरे आदी) विविध फळांची सरबते (जांभूळ सिरप, आंबा सिरप, काजू सिरप, आवळा सिरप आदी) रस, कोकणी खाद्यपदार्थ (मोदक, आंबोळी, थालीपीठ, पुरणपोळी, घावणे, नारळवडी) जेवण, नर्सरी (आंबा कलमे, काजू कलमे, नारळ कलमे, चिकू कलमे, कोकम कलमे, विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे, बोन्साय आदी) मध माफक दरात ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.

प्रदर्शन काळात संध्याकाळी स्वयंसहाय्यता समुहातील सदस्य यांचे मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लोककला, लोकगीत, भारुडे, वैयक्तिक व सामुहिक कार्यक्रम, सहभागी स्टॉल प्रतिनिधींकरीता फनी गेम आयोजित करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाचा सांगता समारंभ २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. उत्कृष्ट मांडणी व सर्वाधिक विक्री करणाऱ्या स्वयंसहाय्यता समुहाचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

नाताळच्या सुट्टीमध्ये कोकणात आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटक येण्याचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे प्रदर्शनात मालाची विक्री मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांनी व्यक्त

केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!