मुख्य बातमी

गोवा क्षेत्रीय कार्यालयात १५ ऑक्टोबरला ‘डाक अदालत’; १२ ऑक्टोबरपूर्वी तक्रारी पाठवण्याचे टपाल खात्याचे आवाहन

रत्नागिरी : टपाल खात्याच्या कामकाजाशी संबंधित प्रलंबित तक्रारींचे जलदगतीने निवारण करण्यासाठी पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी यांच्यावतीने येत्या १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता क्षेत्रीय स्तरावरील ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. या अदालतीसाठी ग्राहकांनी आपल्या तक्रारी १२ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पाठवाव्यात, असे आवाहन रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

टपाल खात्याच्या सेवा देताना अनावधानाने काही त्रुटी राहिल्यास ग्राहकांना योग्य न्याय मिळावा आणि त्यांचे जास्तीत जास्त समाधान व्हावे, यासाठी ही डाक अदालत घेतली जाते. या मंचावर टपाल खात्याचे वरिष्ठ अधिकारी तक्रारदारांशी थेट संवाद साधून तक्रारींचे तात्काळ निवारण करतात.

ज्या तक्रारींचे निवारण संबंधित कार्यालयाकडून सहा आठवड्यांच्या आत झालेले नाही किंवा ज्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही, अशाच तक्रारींची या अदालतीत दखल घेतली जाईल. यामध्ये प्रामुख्याने टपाल, स्पीड पोस्ट, पार्सल, काऊंटर सेवा, डाक वस्तू, बचत बँक आणि मनीऑर्डर या संदर्भातील तक्रारींचा समावेश असेल.

तक्रारीच्या अर्जात तारीख आणि ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार केली होती त्यांचे नाव, पत्ता यासह सर्व सविस्तर तपशील असणे आवश्यक आहे. संबंधितांनी आपला तक्रार अर्ज एका अतिरिक्त प्रतीसह (दोन प्रतींमध्ये) सहायक डाक निदेशक-१, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी – ४०३ ००१ या पत्त्यावर पाठवावा. तक्रार अर्ज १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी संबंधित कार्यालयात पोहोचणे बंधनकारक आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत. टपाल सेवेविषयी तक्रारी असलेल्या ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी विभागाच्या टपाल अधीक्षकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!