भाट्ये येथील झरीविनायक मंदिराचा ९ एप्रिल रोजी कळशारोहण समारंभ
७ ते ११ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनार्यावरील प्रसिद्ध अशा श्री झरीविनायक मंदिराचा जिर्णोध्दार सोहोळा व श्री देव गणपती पुन:प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमानिमित्ताने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार किरण सामंत, आमदार निलेश राणे, आमदार व भाजपाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी आमदार राजन साळवी, उद्योजक अण्णा सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
श्री झरी विनायक जिर्णोध्दार कार्यक्रमानिमित्ताने ७ एप्रिलपासून ११ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ९ एप्रिल रोजी गणेशाची व ११ एप्रिल रोजी हनुमंताची पुन:प्रतिष्ठापना होणार आहे. यावेळी अष्ठोदत्त सहस्त्र कुंभाभिषेक हा धार्मिक सोहळा पुजकांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
दि. ७ व ८ रोजी दुपारी १ ते ५ यावेळेत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. ९ एप्रिल रोजी श्री झरीविनायक मंदिराचा कलशारोहण, मूर्तीची प्रतिष्ठापना व धार्मिक विधी सकाळी १०.२९ वाजता सुरू होणार आहे. दुपारी १ ते रात्री १२ या वेळेत महाप्रसादाचे वाटप होईल. दुपारी १.३० वाजता भजन, तर सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत महाराष्ट्राचा लोकप्रिय आवाज प्रथमेश लघाटे याचा संगितमय नजराणा सादर होणार आहे. यावेळी हास्यकलाकार प्रभाकर मोरे व दत्तू मोरे यांचाही हास्य मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता होममिनिस्टर, ११ एप्रिल रोजी सकाळी ९.२५ वाजता हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. यावेळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले आहे. दुपारी १ वाजता महाप्रसादाचे वाटप होईल. सायंकाळी ७ वाजता “उत्सव माय मराठीचा” हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम होईल.
दिनांक ७ ते ११ एप्रिल या कालावधीत आयोजित केलेल्या विविध धार्मिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांना समस्त रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन झरी विनायक मित्रमंडळ भाट्ये यांनी केले आहे.



