मुख्य बातमी

पोटच्या एक महिन्याच्या मुलीचा खून करणाऱ्या जन्मदातीस जन्मठेप

चिपळूण जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी ठोठावली शिक्षा

रत्नागिरी : अतिरिक्त सत्र न्यायालय चिपळूण येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांनी आज एक महिन्याच्या बालिकेच्या खून प्रकरणी आरोपी मातेस भा.द.वि कलम ३०२ या गुन्ह्याखाली दोषी धरून तिला आजन्म कारावास व २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

या गुन्ह्यातील आरोपी शिल्पा प्रवीण खापले ही तिच्या दोन लहान मुली, नवरा व सासू-सासरे यांच्या सोबत चिपळूण तालुक्यातील वहाळ, घडशीवाडी येथे राहत होती. आरोपी शिल्पा हिला दोन्ही मुलीच होत्या. आरोपीला दुसऱ्या वेळी मुलगा व्हावा अशी तीव्र इच्छा होती; परंतु दुसऱ्यावेळी देखील मुलगीच झाल्यामुळे ती नाराज होती. ५ मार्च २०२१ रोजी तिचे पती रत्नागिरी येथे गेलेले असताना दुपारच्या सुमारास तिने तिच्या एक महिन्याच्या मुलीस घरातील पाण्याने भरलेल्या बादलीत डोके खाली पाय वर अशा स्थितीत ठेवून तिचा खून केला व शेजारचे लोक गोळा झाल्यावर बेशुध्द पडल्याचे नाटक करून ‘ती मी नव्हेच’ असा बेबनाव केला.

सुरुवातीला सावर्डे पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आस्कमिक मृत्यू नोंद करून चौकशी केली; परंतु गुन्ह्याची सर्व परिस्थिती व एकूण पार्श्वभूमी विचारात घेऊन मुलीचा खूनच झाला आहे, असे निष्पन्न झाल्यामुळे भा.द. वि. कलम ३०२ अन्वये सुरुवातीस अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला; परंतु पोलीस उपअधीक्षक सचिन बारी यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपी माता शिल्पा प्रवीण खापले हिनेच खून केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाल्याने तिच्या विरुध्द आरोपपत्र दाखल केले.

या खटल्याची सुनावणी चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांच्या समोर झाली. सरकार पक्षातर्फे ॲड. अनुपमा ठाकूर यांनी आरोपीचा गुन्हा साबित करण्यासाठी एकूण १५ साक्षीदार तपासले. आरोपीचे दुष्कृत्य म्हणजेच एक महिन्याच्या बाळाला मुलाच्या हव्यासापोटी पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये बुडवून ठार मारून बेबनाव करणे या बाबी शाबित करण्यासाठी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे सादर केले. अभिलेखावरील सरकार पक्षाचा एकंदरीत साक्षीपुरावा, वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, शेजारी राहणाऱ्या साक्षीदारांनी दिलेली महत्त्वपूर्ण साक्ष व सखोल युक्तीवाद ग्राहय धरून सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी आरोपीस दोषी धरले व भा.द.वि कलम ३०२ अन्वये आजन्म कारावास व २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

या केसमध्ये सरकारी वकील म्हणून श्रीमती ठाकूर यांनी काम पाहिले. तसेच पोलीस उपअधीक्षक श्री. बारी यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपीविरुध्द आरोपपत्र दाखल केले. या केसकामी कोर्ट पैरवी पोलीस कॉन्सटेबल म्हणून श्री. कांबळे यांनी काम पाहिले.

न्यायालयाने न्यायनिर्णय देताना मुलींबाबतचा सामाजिक दृष्टीकोन विचारात घेवून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ तसेच संविधानाने बालिकांना दिलेले घटनात्मक अधिकार याचा उल्लेख केला. आरोपी एक महिला असून तिने मुलाच्या हव्यासापोटी स्वतःच्याच मुलीचा खून केल्यामुळे आरोपी महिलेस कठोर शिक्षा देऊन स्त्री-पुरुष समानतेबाबतचा संदेश या न्यायनिवाड्यातून दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!