गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोड बंधनकारक; १ जानेवारी २०२७ पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणपती मंदिरात १ जानेवारी २०२७ पासून भाविकांसाठी वस्त्रसंहिता अर्थात ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे. यासंदर्भातील सूचना फलक संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने मंदिर परिसरात लावण्यात आले असून, वस्त्रसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा अंतिम निर्णय संस्थानने घेतला आहे.
संस्थानकडून यापूर्वीही मंदिर परिसरात वस्त्रसंहितेबाबत जनजागृतीपर सूचना फलक लावण्यात आले होते. आता १ जानेवारी २०२७ पासून या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. श्रींच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करताना भारतीय परंपरा आणि मंदिराच्या धार्मिक वातावरणाला साजेसा पोशाख परिधान करणे भाविकांना आवश्यक राहणार आहे.
मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मंदिर हे सर्वांचे श्रद्धास्थान असल्याने समुद्रकिनारी फिरण्यासाठी किंवा पर्यटनासाठी वापरला जाणारा कमी कपड्यांचा पेहराव करून मंदिरात प्रवेश करू नये. गुडघ्याच्या वर येणारे स्कर्ट किंवा ड्रेस तसेच असभ्य भाषा किंवा आक्षेपार्ह चित्रे असलेले कपडे परिधान करणे टाळावे. अशा प्रकारची वेशभूषा असलेल्या भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचेही सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे याबाबत मंदिर प्रशासनाशी वाद घालू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, दहा वर्षांखालील मुलांना या वस्त्रसंहितेच्या नियमातून सूट देण्यात आली आहे. श्रींच्या दर्शनासाठी गणपतीपुळ्यात येणाऱ्या सर्व भाविकांनी वस्त्रसंहितेची नोंद घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.


