महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत सूर्यकांत भटेवरा एज्युकेशन कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन

रत्नागिरी : “भटेवरा फाऊंडेशनला विद्यार्थी नेहमीच प्रिय आहेत. त्यामुळेच विद्यार्थ्यांना मदत, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरिता मदत करतोय. फाऊंडेशनला दहा वर्षे झाली आहेत. आता महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील प्रकल्पात कॉलेज ऑफ नर्सिंग सूर्यकांत भटेवरा एज्युकेशन फाउंडेशन उभे राहणार आहे. दोन संस्था एकत्र आल्या की मोठे कार्य उभे राहणार आहे. भारतात मोठ्या प्रमाणात नर्सेसची गरज आहे. भारतात व परदेशांतही त्यांना मोठी संधी मिळू शकते,” असे प्रतिपादन एस. टी. भटेवरा फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त श्रीमती रोझी भटेवरा यांनी केले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील प्रकल्पामध्ये सूर्यकांत भटेवरा एज्युकेशन कॉम्प्लेक्स इमारतीचे भूमीपूजन केल्यानंतर आयोजित समारंभात त्या बोलत होत्या. १२८ वर्षांची परंपरा लाभलेल्या महर्षी कर्वे स्त्री संस्थेचे संस्थापक महर्षी कर्वे आणि माझे वडिल सूर्यकांत भटेवरा यांच्या विचारसरणीत साम्य होते. महिलांच्या सबलीकरण, सामाजिक कार्य याकरिता वडिलही कार्यरत होते. त्यांना कर्वे संस्थेसोबत आपुलकी होती. त्यामुळेच त्यांनी संस्थेसोबत काम करण्याची इच्छा प्रकट केली. आज ते हयात नसले तरीही रत्नागिरीत त्यांच्या नावाचे एज्युकेशनल कॉम्प्लेक्स उभे राहत असल्याबद्दल आनंद वाटतोय, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी एस. टी. भटेवरा फाउंडेशनचे विश्वस्त मनिष भटेवरा, सचिव अशौक जैन, बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष बेडेकर, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे (पुणे) कार्याध्यक्ष रविंद्र देव, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, कॉलेज ऑफ नर्सिंगचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैद्य धनंजय कुलकर्णी, सीए अभय कुलकर्णी आणि प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी कार्याध्यक्ष रवींद्र देव यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “जगात महर्षी अण्णांचे मोठे स्थान होते, याची कागदपत्रे आम्हाला सापडली आहेत. पुण्यात संस्थेतर्फे रुग्ण सहाय्यक अभ्यासक्रमामुळे मी पैसे मिळवू लागल्यानंतर घरामध्ये सन्मान मिळू लागल्याची उदाहरणे आहेत. रत्नागिरीतही हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. नागपूरमध्ये आमच्या नर्सिंग कॉलेजच्या ४ विद्यार्थिनींनी एक बसमधून जाताना हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशाचे प्राण वाचवल्याची घटनाही मध्यंतरी घडली. संस्थेच्या विद्यार्थिनी संवेदनशील आहेत, हे याचे उदाहरण. शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय विचार रुजण्यासाठी संस्था काम करत आहे.”
वैद्य धनंजय कुलकर्णी यांनी संस्थेचा शतकी इतिहास सांगितला. संवेदनशील विद्यार्थिनी घडवण्याचे काम संस्था करत असून संस्थेची ७६ युनिट्स कार्यरत असल्याचे सांगितले. रत्नागिरी प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई यांनी नर्सिंग, बीएड अभ्यासक्रम, बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा थोडक्यात आढावा घेतला.
आश्रमगीत, दीपप्रज्वलन व भारतमाता, महर्षी कर्वे व बाया कर्वे यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. नर्सिंग कॉलेजच्या प्र. प्राचार्य समिना मुलाणी यांनी आभार मानले. सौ. प्रतिभा लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. वेदिका आगाशे यांनी सादर केलेल्या पसायदानाने सांगता झाली.
कार्यक्रमाला बांधकाम व्यावसायिक संतोष तावडे व निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरचे भागीदार, संचालक, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत, कार्यकारिणी सदस्य शिल्पा पानवलकर, प्रसन्न दामले, मोहन भावे, सौ. संपदा जोशी, बीसीए कॉलेजच्या प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर आदी उपस्थित होते.



