
चिपळूण : शहरातील प्रभाग क्रमांक ७-अ मधील नगरसेवक पदाची निवडणूक अक्षरशः शेवटच्या मतापर्यंत श्वास रोखून धरणारी ठरली. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या या लढतीत भाजपचे उमेदवार संदीप भिसे यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने विजय मिळवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
या निवडणुकीत भाजपचे संदीप भिसे यांना ४१८ मते, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार सुनील रेडीज यांना ४१७ मते मिळाली. केवळ एका मताने पराभव स्वीकारावा लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात निराशेचे वातावरण दिसून आले, तर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.
मतमोजणीदरम्यान प्रत्येक फेरीत दोन्ही उमेदवारांमधील मतांचा फरक अत्यंत कमी असल्याने मतमोजणी केंद्रावर तणावाचे वातावरण होते. अंतिम निकाल जाहीर होताच भाजप समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. “एक मत – पण विजय आपलाच!” अशी प्रतिक्रिया समर्थकांकडून व्यक्त करण्यात आली.
या थरारक निकालामुळे प्रभाग ७-अ ची निवडणूक चिपळूण शहरातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली असून, एका मताचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.



