कोदवलीनजीक कंटेनर डिव्हायडरला धडकून उलटला; चालक किरकोळ जखमी

राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोदवलीनजीक मालवाहू कंटेनर डिव्हायडरला धडकून पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात आज (२५ सप्टेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू कंटेनर (क्र. एमएच ०४ जेके ७०३९) मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. कोदवलीनजीक आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गाच्या डिव्हायडरला धडकला. त्यानंतर कंटेनर रस्त्यावर पलटी झाला.
अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनरची पाहणी केली. या दुर्घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघाताची नोंद व पुढील कार्यवाही राजापूर पोलीस करत आहेत.



