उद्या खल्वायनची गुढीपाडवा संगीत मैफल पं. रामदास कामत यांच्या गाण्यांनी रंगणार

रत्नागिरी : खल्वायन रत्नागिरी या संस्थेची गुढीपाडवा विशेष संगीत मैफल उद्या (३० मार्च) सायंकाळी ५ ते ७.३० या वेळात नेहमीप्रमाणेच गुरुकृपा मंगल कार्यालय, पऱ्याची आळी, बाजारपेठ,रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली असून, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रायोजकत्व लाभलेल्या या मैफलीत संगीत रंगभूमीवरील एकेकाळचे ज्येष्ठ आणि सुप्रसिध्द गायक नट कै. पंडित रामदास कामतबुवा यांनी गाऊन अजरामर केलेल्या भाव ,भक्ती, चित्रपट व नाट्यगीतांच्या सादरीकरणाने ही मैफल रंगणार आहे. मुंबईच्या व्यावसायिक संगीत रंगभूमीवरील प्रसिध्द गायक नट धवल भागवत व प्रतीक फणसे ही जोडगोळी ही गीते सादर करणार आहेत.
धवल भागवत यांना बीएससी व एमसीए या पदव्या प्राप्त असून वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी गायन शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला प्राथमिक शिक्षण श्री. रवी पोंक्षे यांच्याकडे झाले. नंतर श्री. समीर अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास यांनी केला. त्यानंतर जवळपास ११ वर्षे पं. मधुकर जोशी यांच्याकडे ग्वाल्हेर-जयपूर-आग्रा घराणा शैलीचे शिक्षण घेतल. विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानमधून नाट्यसंगीत डिप्लोमा विशेष श्रेणीत पूर्ण केला, ज्यात पं. रामदास कामत, शुभदा दादरकर, श्रीकांत दादरकर, ज्ञानेश पेंढरकर, अर्चना कान्हेरे, रजनी जोशी, अरविंद पिळगावकर यांसारख्या गुरूंचे मार्गदर्शन मिळाले. तसेच सध्या नाट्यसंगीतासाठी पं. मकरंद कुंडले यांचं मार्गदर्शन घेत आहे.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग, दूरदर्शन सह्याद्री, मुंबई मराठी साहित्य संघ, नेहरू सेंटर वरळी, दादर माटुंगा कल्चरल सेंटर, अंबरनाथ संगीत सभा, काळा घोडा फेस्टिवल अशा विविध व्यासपीठांवर नाटक, गायन आणि नाट्यसंगीत सादरीकरण यांनी केले आहे मुंबई मराठी साहित्य संघ निर्मित, स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खड्ग, नेहरू सेंटर निर्मित संगीत सागर सात सुरांचा, ललितकलादर्श निर्मित संगीत हाच मुलाचा बाप यांसारख्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सध्या रंगभुमी वर चालू असलेल्या विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानच्या “संगीत बावनखणी” मध्ये दुहेरी भूमिका साकारत आहेत. २०१९ मध्ये मुंबई मराठी साहित्य संघाकडून गायक-अभिनेता पुरस्कार यांना मिळाला आहे.
प्रतीक फणसे यांनी गेली २३ वर्षे ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिध्द गायक पंडित भरत गंगाधर तेलंग यांचेकडून शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले आहे. संगीत विशारद व एम ए (म्युझिक) या पदव्या त्यांना प्राप्त आहेत. नाट्य संगीत डिप्लोमा त्यांनी सौ. शुभदा दादरकर, श्री. श्रीकांत दादरकर व कै. अरविंद पिळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला आहे. एम कॉम ही पदवी सुध्दा त्यांनी प्राप्त केली आहे. सेंट्रल रेल्वेच्या कल्चरल डिपार्टमेंट मध्ये ते कार्यरत आहेत. संगीत अमृतसिद्धी, संगीत लेणं सुरांच, संगीत अमृतसिद्धी, संगीत सौभद्र, चि. सौ. का. रंगभूमी आणि सध्या संगीत बावनखणी या नाटकातून त्यांनी गायक नटाच्या भूमिका केलेल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे शास्त्रीय व नाट्यसंगीताचे कार्यक्रम झाले असून, मुंबई मराठी साहित्य संघ यांचा नाट्यसंगीतासाठी व सेंट्रल रेल्वेचा शास्त्रीय संगीतासाठी पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. सदरहू कार्यक्रमाला ऑर्गन साथ चैतन्य पटवर्धन, तबला साथ प्रथमेश शहाणे, तालवाद्य साथ वर्धन ओळकर व निवेदन प्रदीप तेंडुलकर हे करणार आहेत.
सर्व रसिकांना प्रवेश विनाशुल्क असून रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन खल्वायन अध्यक्ष श्री. मनोहर जोशी यांनी केले आहे.


