रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे ४ मे रोजी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ अल्टरिनचाम , इंग्लंड, आणि वालावलकर हॉस्पिटल ,डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (४ मे) संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत कॅन्सर परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादांमध्ये कर्करोगावरील अद्ययावत नवीन अशी प्रभावी उपचार पद्धती आणि निदान यावरती तज्ञ डॉक्टर्स चर्चा करणार आहेत. हा परिसंवाद ऑनलाईन होणार आहे.
इंग्लंडवरून डॉ. रवींद्र सावंत आणि डॉ. तृप्ती कुलकर्णी, टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल मुंबईतर्फे डॉ. रूमेली रॉय, वालावलकर हॉस्पिटलच्या मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुवर्णा पाटील, याच हॉस्पिटलचे न्यूक्लिअर मेडिसिनमधील तज्ञ डॉ. अभय गोंधणे आणि रेडिओलॉजिस्ट डॉ. नेताजी पाटील अशी दिग्गज आणि अनुभवी मंडळी या विषयावरती चर्चासत्र करणार आहेत.
हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत आहे. या कार्यक्रमाचे युट्युबवर लाईव्ह प्रसरण होणार आहे. तसेच जर कोणाला या कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन आपले काही प्रश्न विचारायचे असतील, तर झूम माध्यमावर सुद्धा या कार्यक्रममध्ये सहभागी होता येणार आहे. हे चर्चासत्र मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये होणार आहे.
या चर्चासत्रामध्ये सहभागी होऊन कॅन्सर या विषयाशी निगडित असे नवीन तंत्रज्ञान, त्याच्या निदानात वापरल्या जाणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाविषयी, नवीन प्रभावी उपचार पद्धती विषयी आणि आपल्या मनात उद्भवणाऱ्या अनेक शंकांविषयी लोकांनी या तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे करण्यात आले आहे.



