मुख्य बातमी

प्रमुख पर्यटन स्थळ, बीचेस्, पर्यावरण संवेदनशील ठिकाणी संपूर्ण प्लास्टिक बंदी

घनकचरा व्यवस्थापन नियम अंमलबजावणी विशेष कक्षाच्या बैठकीत नियमावली तयार करण्याची जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची सूचना

रत्नागिरी : सर्वप्रथम पर्यावरण संवेदनशील ठिकाणे, सह्याद्री पश्चिम घाट, बीचेस्, प्रमुख पर्यटन स्थळे या ठिकाणी संपूर्णपणे प्लास्टिक बंदी राबविण्यासाठी नियमावली तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज (१० ऑगस्ट) दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्याकरिता घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या अंमलबजावणीबाबत स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधकारी परिक्षित यादव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी संदीप टोपे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, उप परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, मुख्याधिकारी वैभव गारवे आदी उपस्थित होते.

श्री. टोपे यांनी विषय वाचन करून घनकचरा व्यवस्थापनाबाबत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची कर्तव्ये याविषयी माहिती दिली.

जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, टप्प्या टप्प्याने प्लास्टीक बंदी करण्याबाबत सर्व यंत्रणांनी अंमलबजावणीबाबत नियोजन करावे. सर्वप्रथम प्राधान्याने ज्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते, अशा प्रमुख पर्यटन स्थळी बीचेस्, पर्यावरण संवेदनशील ठिकाणे, सह्याद्री पश्चिम घाट अशा ठिकाणी नियोजन करावे. त्यासाठी कचरा कुंड्या, वेंडीग मशीनस्, आरओ यंत्रणा, वॉटर एटीएम यांची सुविधा सर्व प्रथम करावी. त्यासाठीचे आराखडे तयार करावेत. सामाजिक संघटनांचा सहभाग वाढवावा. प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत नियोजन करावे.

जिल्हा परिषद आणि नगरपालिका यांनी घनकचरा व्यवस्थापन करण्याबाबत धोरण, रणनिती ठरवावी. त्यासंदर्भातला घनकचरा संकलन, वाहतूक आराखडा पुढील पाच वर्षांसाठी घनकचरा निर्मितीचा अंदाज, कचरा पेट्या ठेवण्याचे वेळापत्रक, कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रक्रिया याबाबतचा आराखडा तयार करावा. फोर वे सेग्रीगेशन व्हायला हवे, तसा आराखडा तयार करावा. तसेच १५ ऑगस्टला होणाऱ्या विशेष ग्रामसभेत याबाबतची माहिती द्यावी. ग्रामीण भागात कुक्कुटपालन, गोठे असणाऱ्या ठिकाणी गोबर गॅस निर्मितीवर भर द्यावा.

पर्यटक, नागरिक, विक्रेते यांच्यामध्ये सर्वप्रथम जनजागृती करण्यावर भर ठेवा. त्यानंतर जादा दंडाची आकारणी करून प्लास्टिक बंदीसाठी सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!