मुख्य बातमी

भगवा सप्ताहाच्या निमित्ताने रत्नागिरीत शिवसेनेचा संघटनात्मक हुंकार

‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियान गावागावात पोहोचविण्याचा निर्धार : सुभाष देसाई व विजय कदम यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर उत्साहात साजरा होत असलेल्या ‘भगवा सप्ताहा’च्या निमित्ताने रत्नागिरीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक शक्तीचे प्रभावी दर्शन घडले. शिवसेना नेते तथा माजी मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना उपनेते विजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जिल्हा कार्यकारिणी, संघटनात्मक संवाद आणि मार्गदर्शन बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

ही बैठक केवळ पदाधिकाऱ्यांची औपचारिक बैठक न राहता, आगामी काळातील पक्षाची दिशा निश्चित करणारा आणि तळागाळातील संघटनात्मक बांधणीला नवी ऊर्जा देणारा महत्त्वपूर्ण संवाद ठरली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा अधिक ताकदीने पुढे नेताना ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ हे अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि घराघरापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

या बैठकीस रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुरेश कदम, माजी मंत्री रविंद्र माने, माजी आमदार गणपत कदम, जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, जिल्हा संघटक संतोष थेराडे, लोकसभा महिला संपर्क संघटिका नेहा माने, जिल्हा महिला संघटिका वेदा फडके, ओबीसी सेल प्रमुख पांडुरंग उपळकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, विधानसभा संघटक रामचंद्र (तात्या) सरवणकर, युवासेना उपसचिव प्रद्युम्न माने, जिल्हा युवा अधिकारी प्रसाद सावंत, शिवसहकार जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, शिवसहकार संपर्कप्रमुख सुधीर मोरे, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, मयुरेश पाटील, बंड्या बोरुकर, युवराज हांदे, कमलाकर कदम, तालुका संपर्कप्रमुख शांताराम चव्हाण, मुकुंद पड्याळ, मंगेश साळवी, अनिल भुवड, उपजिल्हा संघटिका सायली पवार, उल्का विश्वासराव, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे,भैया कदम, संजय पवार, उपजिल्हा अधिकारी संतोष हातणकर, महिला तालुका संघटिका ममता जोशी, पूर्वा मुळ्ये, मेघा कदम, प्राची शिर्के, संपर्क संघटिका माधुरी मांजरेकर, समीक्षा सक्रे, दीक्षा आंब्रे यांच्यासह रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यातील सर्व उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, मुंबईतील पदाधिकारी, विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विभागीय पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना शिवसेना नेते तथा माजी मंत्री सुभाष देसाई यांनी संघटना ही केवळ पदांची रचना नसून, सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जिवंत संपर्कातून उभी राहते, यावर भर दिला. जिल्ह्यातील पक्षाच्या संघटनात्मक रचनेत ज्या-ज्या ठिकाणी पदे रिक्त आहेत, ती पदे तातडीने भरून संघटनेची साखळी अधिक सक्षम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियान केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे आवाहन करताना त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सर्वसामान्यांशी थेट संपर्क वाढविण्याचे निर्देश दिले.

“सर्वसामान्यांची छोटी-मोठी कामे आपण केली पाहिजेत. अडचणीच्या काळात सर्वसामान्यांना आधार देण्याची गरज आहे. शिवसेनेने हे काम नेहमीच केले आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागून कोकणात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे आवाहन सुभाष देसाई यांनी केले.

शिवसेना उपनेते विजय कदम यांनी आगामी काळातील राजकीय आणि संघटनात्मक आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी-वस्तीत आणि प्रत्येक मतदारापर्यंत पक्षाची भूमिका व शिवसेनाप्रमुखांचे विचार पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली. तळागाळातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमधील संवाद अधिक मजबूत करून संघटनेची बांधणी अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत आगामी काळातील पक्षाची वाटचाल, संघटनात्मक बांधणी, रिक्त पदांची पूर्तता, तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे रस्त्यावर उतरणे, या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातील संघटना अधिक सक्रिय करून पक्षाचे काम गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

भगवा सप्ताहाच्या निमित्ताने झालेल्या या बैठकीतून शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा आणि संघटनेची मूलभूत ताकद यांचा पुनरुच्चार करण्यात आला. ‘भगवा हा केवळ रंग नाही तर तो स्वाभिमान, संघर्ष, निष्ठा आणि अस्मितेची ओळख आहे,’ ही भावना बैठकीच्या केंद्रस्थानी होती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली ती केवळ सत्तेच्या राजकारणासाठी नव्हे, तर मराठी माणसाचा स्वाभिमान जागविण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी. बदलत्या राजकीय परिस्थितीतही हा विचार अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आजच्या शिवसैनिकांवर आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियानाच्या माध्यमातून जनतेशी संपर्काची नाळ अधिक घट्ट करून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत आणि प्रत्येक वाडी-वस्तीमध्ये संघटनेचा भगवा पोहोचवत कोकणात शिवसेना अधिक बळकट करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!