पटवर्धन हायस्कूलचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश
पूर्वा माईणकर आणि वेदांग कुलापकर या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण प्राप्त

रत्नागिरी : इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, यात शहरातील पटवर्धन हायस्कूलचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. शाळेतील वेदांग कुलापकर आणि पूर्वा माईणकर या दोन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.

शाळेतील प्रथम पाच विद्यार्थी : वेदांग नितीन कुलापकर (१०० टक्के), पूर्वा राजन माईणकर (१०० टक्के), श्रावणी बाहुबली नाईक (९९.२० टक्के), श्रेया गंगाराम मुदगल (९८.२०), दिव्यांका अमर घाटगे (९८.००), मैत्रेयी शैलेश काळे (९६.८०).
१२९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले असून, १२० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर ७० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचा निकाल ९८.४७ टक्के लागला. मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, तसेच पर्यवेक्षक अमर लवंदे व श्रीमती कल्पना शिरोळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उत्तम निकाल साध्य केला.
संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, कार्याध्यक्षा श्रीमती नमिता कीर आणि कार्यवाह सुनील वणजु यांनी निकालाबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे व चंद्रकांत घवाळी तसेच संस्थेचे सहकार्यवाह संजय जोशी यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
भारत शिक्षण मंडळ व पटवर्धन प्रशालेमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. हा दिमाखदार निकाल हे या संस्थेतील शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांचे समर्पण व पालकांचे आशीर्वाद व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फलित आहे.


