५९ वी महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महिला गटात रत्नागिरीची आकांक्षा कदम विजेती

नवी मुंबई : नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित ५९ वी महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा उदय कदम हिने मुंबईच्या मिताली पाठक वर १७-१४, २५-०२, २५-०१ अशा तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात मात करून महिला गटाचे विजेतेपद पटकाविले.
ही स्पर्धा १० मे ते १३ मे या कालावधीत रोजी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, सेक्टर १ A, MGM हॉस्पिटल, वाशी, नवी मुंबई येथे झाली.

आकांक्षा कदम हिने मिळवलेल्या या यशाबद्दल उद्योग व मराठी भाषा मंत्री, तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम, राजापूरचे आमदार किरण उर्फ भैया सामंत, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सल्लागार सुचय अण्णा रेडीज, अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सचिव मिलिंद साप्ते व खजिनदार नितीन लिमये आणि सर्व जिल्हावासियांनी अभिनंदन केले आहे.



