मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची गोवंशीय हत्या व अवैध गोवंशीय वाहतूक विरोधात विशेष मोहीम

रत्नागिरी : जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गोवंशीय हत्या, गोवंशीय अवैध वाहतूक, गोवंशीय अवैध मांस विक्री तसेच संबंधित बेकायदेशीर कृत्यांना प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६, प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ अंतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना संबंधित कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. त्यानुसार २३ मेपासून जिल्हास्तरावर चार विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून ही पथके एकूण चार पोलीस उपविभागांमध्ये कार्यरत आहेत.

या भरारी पथकांना गोवंशीय अवैध वाहतूक, गोवंशीय हत्या, तस्करी, गोवंशीय अवैध मांस विक्री तसेच संबंधित बेकायदेशीर कृत्यांची माहिती मिळताच तात्काळ छापे टाकून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस उपविभागासाठी स्वतंत्र कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले असून त्यानुसार सातत्याने गस्त व तपासणी मोहिम राबविण्यात येत आहेत.

पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी गोवंशीय तस्करीमध्ये वारंवार सहभागी होणाऱ्या व्यक्ती अथवा संघटित टोळ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा तसेच संघटित स्वरूपात अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ (म. को. का.) अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

या विशेष मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गावपातळीवर प्रभावी माहिती संकलन व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांचीही नोडल (समन्वयक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गोवंशीय अवैध वाहतूक, गोवंशीय हत्या किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची माहिती मिळाल्यास संबंधित नोडल अधिकारी, भरारी पथकातील पोलीस अधिकारी अथवा डायल ११२ या आपत्कालीन हेल्पलाईनवर किंवा थेट पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या 8857848157 या मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क करून या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.

यासाठी विशेष मोहिमे नोडल अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे (9011995777) काम पाहणार आहेत. विशेष भरारी पथकाच्या खेड उपविभागात पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले (खेड, 8779645091), चिपळूण उपविभागात पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव (चिपळूण, 7776059378), रत्नागिरी उपविभागात पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे (रत्नागिरी शहर, 9028389445) आणि लांजा उपविभागात पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे (राजापूर, 7350028482) यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नोडल (समन्वयक) म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील काम पाहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!