जांभेकर विद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

रत्नागिरी : येथील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वंकष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात डॉ. शैलेश पाटील, डॉ. मीनल झोपे, फार्मासिस्ट माधुरी विरकर तसेच एएनएम सारा गडदे यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. तपासणीनंतर ३४ विद्यार्थ्यांना आवश्यक औषधे देण्यात आली. २२ विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले. या आरोग्य तपासणीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या वेळेवर निदर्शनास आल्या. त्यांच्यावर योग्य उपचार होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी अशा आरोग्य तपासणी शिबिरांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे या वेळी उपस्थित वैद्यकीय पथकाने सांगितले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संजना तारी यांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.



