
रत्नागिरी : शिक्षणमहर्षी बाबुराव जोशी व मालतीबाई जोशी या दांपत्याने रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यांच्या या दूरदर्शी विचाराला पाठिंबा म्हणून कै. नारायण रघुनाथ तथा नानासाहेब गोगटे यांनी वडिलांच्या स्मरणार्थ आर्थिक सहाय्य केले. त्यामुळे आज हे महाविद्यालय र. प. गोगटे कला आणि विज्ञान महाविद्यालय या नावाने एक प्रतिष्ठित महाविद्यालय म्हणून उभे आहे. अशा संवेदनशील आणि दानशूर व्यक्तिमत्त्वाची जाणीव ठेऊन आणि ज्यांच्यामुळे या परिसरामध्ये आपण अभिमानाने वावरतो, याची जाण ठेवून ज्ञानदानाचे कार्य करत राहूया, असे प्रतिपादन प्र. प्राचार्या आणि कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले.
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे आद्य देणगीदार कै. नारायण रघुनाथ गोगटे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमात डॉ. आठल्ये बोलत होत्या. याप्रसंगी गोगटे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले. दरवर्षी महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांनी उच्च शिक्षणाची सोय करण्यासाठी १९४५ मध्ये शैक्षणिक संस्था स्थापन केली. संस्थेच्या सुरुवातीच्या काळामध्ये कै. नारायण रघुनाथ गोगटे तथा नानासाहेब गोगटे यांची आर्थिक मदत फार मोलाची ठरली. समारंभ समिती सदस्या प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, परीक्षा समन्वयक डॉ. विवेक भिडे, विविध विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.



