मुख्य बातमी

यापुढे संघटना म्हणून निर्णय घेतले जातील : पालकमंत्री उदय सामंत

जिल्हा परिषद व पंचायत समितीतील विजयी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत मार्गदर्शन

रत्नागिरी : आपण लोकप्रतिनिधी झालो आहोत ते शिवसेनेमुळे निवडून आलो आहोत हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. यापुढे संघटना म्हणून निर्णय घेतले जातील. जिल्हा परिषदेसह पंचायत समितीमध्येही गटनेत्याबरोबरच मुख्य पक्षप्रतोदही नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एकाकडेच जबाबदारी राहणार नाही, दोघांनी मिळून पक्षाशी बांधिल राहत कामकाज चालवायचे आहे. दोघांची भूमिका ही पक्षाची भूमिका असणार असल्याचे स्पष्ट करतानाच जिल्ह्यातील पंचायत समितीचे गटनेते व पक्षप्रतोद यांची नावे जाहीर केली.

शहरातील जयेश मंगल पार्क येथे शिवसेनेच्या चिन्हावर विजयी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी ना. सामंत यांनी यापुढे पक्षाला केंद्रस्थानी ठेवूनच काम केले जाईल असे स्पष्ट शब्दात विजयी झालेल्या लोकप्रतिनिधींचे कान टोचले. यावेळी व्यासपीठावर राजेंद्र महाडिक, प्रदीप उर्फ बंड्या साळवी, राहुल पंडित, विलास चाळके, महेश (बाबू) म्हाप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्यांनी जिल्ह्यामध्ये राज्याच्या तुलनेत सर्वाधिक उमेदवार शिवसेनेचे विजयी झाले आहेत. हा शिवसेना कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा मोठा विजय असल्याचे सांगितले. आत विजयी झाल्यावर या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका, नायतर गय केली जाणार नाही. अनेक बंडखोरांशी आपल्याच लोकांनी मैत्री जपली, त्याचा फटका सर्वाधिक संगमेश्वरमध्ये बसला आहे. यापुढे पक्षाशी दगाफटका करण्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ते पुढे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वाधिक जि.प. व पं.स. सदस्य विजयी झाले आहेत. राज्यात 94 टक्के स्ट्राईक रेट रत्नागिरीचा आहे. काही आपल्याच पदाधिकाऱ्यांनी बंडखोरांशी मैत्रि जपली, नाहीतर हा स्ट्राईकरेट शंभर टक्केवर नक्कीच गेला असता असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पक्षाच्या लोकप्रतिनिधींशी भविष्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सोबतच्या खुर्चीत बसवावे. नाहीतर पदाधिकारी एका बाजूला आणि विरोधक शेजारील खुर्चीत दिसून येतील असा टोलाही लगावला. आपण, भैय्या आणि योगेश कदम यांनी मोठ्या प्रमाणात निधी मतदारसंघात आणला; मात्र काही पदाधिकारी हा निधी आपणच आणला असे मतदारांसमोर सांगत असल्याचेही प्रचारादरम्यान ग्रामस्थांसोबतच्या भेटीत दिसून आले.

जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, पं.स. सभापती-उपसभापती ही पदे सव्वा वर्षासाठी असणार आहेत. त्याचप्रमाणे गटनेते आणि मुख्यपक्षप्रतोद ही पदेही सव्वा वर्षासाठी असणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे असेच हास्य निवडून दिलेल्या मतदारांच्याही चेहऱ्यावर दिसले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा परिषद गटनेतेपदी विलास चाळके, यांची तर प्रतोदपदी महेश उर्फ बाबू म्हाप यांची निवड केल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच पंचायत समितीसाठी खेड तालुक्यातील सुनील मोरे, दापोलीतील निलेश शेठ, मंडणगडमधील अनिल रहाटे व दीपक मालुसरे,

लांजातील उमेश पत्की, राजापूरमधून उमेश पराडकर व प्रसाद मोहरकर, संगमेश्वरातील सुहास मायंगडे व सुरेश माईण, गुहागरसाठी गौरव वेल्हाळ व प्रणव पोळेकर, चिपळूणमध्ये विनोद झगडे व बापू आयरे, तर रत्नागिरीमध्ये सौ. अर्चना साळवी व तारक मयेकर यांची निवड केल्याचे जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!