आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर तालुक्याची मान्सून आढावा बैठक

राजापूर : लांजा- राजापूर- साखरपुडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज राजापूर तालुक्याची मान्सून आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार सामंत यांनी आढावा घेतला.
राजापूर शहर पूररेषेबाबत जनतेला विश्वासात घेऊन काम करा. पूररेषेचा पाठवलेला रिपोर्ट पुन्हा जनतेला विश्वासात घेऊन करा. नगर परिषदच्या हद्दीतील गटारे, मोऱ्या साफ करण्याच्या सूचना आमदार किरण सामंत यांनी यावेळी दिल्या.
नगर पालिकेकडे असलेल्या बोटी अद्ययावत करून पूरस्थितीत वापरता येतील याची तयारी करा. तसेच आरोग्य, जलसंधारण, धरणे, दवाखाने, कृषी, जिल्हा परिषद रस्ते, सार्वजनिक बांधकाम रस्ते, पूल, मोऱ्या, महावितरण, वनविभाग, शाळा, धरणे, पर्यटन स्थळे अशा विविध विभागांचा आढावा घेतला. मान्सूनमध्ये तालुक्यातील जनतेला त्रास किंवा हानी होणार नाही याची दक्षता घेऊन काम करण्याचे आदेश आमदार सामंत यांनी बैठकीत दिले. तसेच मान्सूनच्या काळात प्रत्येक विभागाचा कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी राजापूर तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी निलेश जगताप, पोलिस निरीक्षक जनार्दन खेडकर, अशपाक हाजू, विलास चाळके, राजू कुरूप तसेच सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.



