मुख्य बातमी

भारतीय संस्कृती वैभवाकडे नेण्यासाठी कोकणचे योगदान महत्त्वपूर्ण : गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे

विश्वशांती आणि राष्ट्रहितासाठी रत्नागिरीत महासत्संग सोहळा अपूर्व उत्साहात

रत्नागिरी : “भारतीय संस्कृती आणि मराठी अस्मिता वैभवाकडे नेण्यासाठी कोकणचे योगदान महत्त्वपूर्ण आहे,” असे गौरवोद्गार अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी काढले तेव्हा उपस्थित हजारो सेवेकर्‍यांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट करून स्वामीनामाचा प्रचंड जयघोष केला.

विश्वशांती, राष्ट्रहित आणि समाज कल्याणासाठी गुरुमाऊली श्री. मोरे यांच्या पावन सान्निध्यात रत्नागिरीमध्ये महासत्संग सोहळा तथा सामूहिक श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठण आणि श्री चक्रराज श्रीयंत्र पूजनाची अतिउच्च सेवा अपूर्व उत्साहात आणि सेवेकऱ्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादात पार पडली. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, गुरुमाता सौ. मंदाताई तथा काकूसाहेब मोरे यांची hविशेष उपस्थिती होती.

आपल्या अमृततुल्य हितगुजामध्ये गुरुमाऊली श्री. मोरे यांनी कोकणच्या संस्कृतीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. “कोकणात पहाट झाली की सडामार्जन करून दाराभोवती सुंदर रांगोळी रेखाटली जाते. घरात आलेल्या पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केले जाते. अनेक लोकोत्तर महापुरुष कोकणात होऊन गेले. स्वामी चरित्रातील अनेक सत्पुरुष हे देखील कोकणातीलच आहेत. कोकण ही नररत्नांची अक्षरशः खाण आहे. ग्रामदेवतांचे सर्वाधिक मानसन्मान हे देखील कोकणातच होतात. अशा निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या कोकणात पूर्वी येणे- जाणे होत असे. आता कार्य बाहुल्यामुळे एक तपानंतर येण्याचा योग आला आहे. अशा शब्दात गुरुमाऊली श्री मोरे यांनी कोकण भूमीचा गौरव केला. स्वामी सेवा कार्याचा आढावा घेऊन आदर्श, निर्व्यसनी पिढी घडविणे हा स्वामी कार्याचा पाया आहे.

ना. उदय सामंत यांच्या शुभेच्छा 

राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी परमपूज्य गुरुमाऊलींच्या सेवाभावी मानवतावादी कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहावेत अशी भावना व्यक्त केली. आज केवळ परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी आलो आहे असेही त्यांनी नमूद केले.

हापूस आंबा आणि लाडूंची तुला

परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांचा अभीष्टचिंतन सोहळा कोकण विभाग समितीतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने परमपूज्य गुरुमाऊलींची हापूस आंबा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या लाडूच्या प्रसादाची तुला करण्यात आली. गुरुमाता सौ. काकूसाहेब मोरे यांनी गुरुमाऊलींचे औक्षण केले तेव्हा हजारो सेवेकर्‍यांनी हात उंचावून गुरुमाऊलींना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली आणि तुला संस्कार होत असताना स्वामीनामाचा जयजयकार करून वातावरण दुमदुमून टाकले.

मराठी अस्मितेचे प्रदर्शन…

मराठी महिन्यातील सण- वार उत्सव कसे साजरे करावेत या संबंधित मराठी अस्मितेचे प्रदर्शन कार्यक्रमस्थळी भरविण्यात आले होते. कोकण आणि गोव्यातून आलेल्या हजारो सेवेकर्‍यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कौतुक केले. गुरुमाऊलींनीही आपल्या हितगुजामध्ये या प्रदर्शनाचा आवर्जून उल्लेख केला.

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भावे यांनी गुरुमाऊलींच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला, तर कोकण प्रतिनिधी विकास शेटे यांनी प्रास्ताविक केले. नाशिकचे सेवेकरी मुकुंद कुलकर्णी यांनी नेटक्या शब्दात सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी सेवाकेंद्रातील सर्व प्रतिनिधींसह कोकणातील सेवेकर्‍यांनी अविश्रांत मेहनत घेतली. कोकणातील असंख्य स्वयंसेवी संस्थातर्फे परमपूज्य गुरुमाऊलींचे स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!