संतप्त तळवडे ग्रामस्थांची महावितरण कार्यालयावर धडक

लांजा : वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, विद्युत उपकरणांचे होणारे नुकसान, पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम आणि संबंधित अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे संतप्त झालेल्या तळवडे येथील शेकडो ग्रामस्थांनी मंगळवारी रात्री थेट लांजा येथील महावितरण कार्यालयावर धडक देत तीव्र नाराजी व्यक्त केली. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
लांजा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना सततच्या वीज खंडितीचा सामना करावा लागत आहे. तळवडे गावात गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
मंगळवारी रात्री मोठ्या संख्येने ग्रामस्थ महावितरण कार्यालयात दाखल झाले. मात्र, तक्रारींसाठी जबाबदार मानले जाणारे संबंधित सहाय्यक अभियंता कार्यालयात उपस्थित नसल्याचे आढळून आल्याने ग्रामस्थांचा संताप आणखी वाढला.
परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरण प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढली. त्यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी संयमाची भूमिका घेत प्रशासनाशी चर्चा करण्यास सहमती दर्शविली.
यानंतर लांजा महावितरणचे सहाय्यक अभियंता निलेश कुलकर्णी यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी वारंवार होणाऱ्या वीज खंडितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तळवडे विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडून तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. तसेच नागरिकांशी योग्य संवाद साधून समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची मागणीही करण्यात आली.
सहाय्यक अभियंता निलेश कुलकर्णी यांनी ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, सुमारे दीड तास ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या घटनेमुळे तालुक्यातील वीज समस्येचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये वाढत चाललेली नाराजी उघडपणे समोर आली आहे.

