जी. एच. रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेच्या खुल्या गटात वरद पेठे तर महिला गटात सई प्रभुदेसाई विजेती

रत्नागिरी : जी. एच. रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा २०२५-२६ रा.भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात १७ व १८ मे रोजी रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांना रायसोनी फौंडेशन तर्फे विशेष सहकार्य लाभले होते. खुल्या व महिलांच्या गटातून ४ -४ खेळाडूंची निवड राज्य निवड स्पर्धेसाठी करण्यात आली.

दि. १८ रोजी खुल्या व महिला गटांच्या निवड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांच्या बक्षीस समारंभाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव, अभाविप प्रदेश अध्यक्ष, कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट व व्होकेशनल बोर्ड अशा विविध आघाड्यांवर कार्यरत असलेले विद्यार्थीप्रिय शिक्षक श्रीकांत दुदगीकर व अनुभवी फिडे मानांकित बुद्धिबळपटू, भारतीय जीवन विमा निगम रत्नागिरी येथे विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अनंत गोखले उपस्थित होते.

श्री. दुदगीकर यांनी बुद्धिबळ हा खेळ आपल्या सर्वांगीण व्यक्तिमत्वावर कसा बदल घडवू शकतो यावर खेळाडूंना संबोधित केले. एकाग्रता, संयम, मेहनत आणि चिकाटी ही यशाची चतुःसूत्री त्यांनी मुलांना सांगितली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. निधी मुळ्ये हिने तुलनेने अधिक काठीण्य पातळी असलेल्या खुल्या गटात खेळून आपल्या खेळाचा कस पणाला लावत खुल्या गटातून खेळूनही जिल्हा संघात स्थान मिळवले. वरद पेठे (६/६) व सई प्रभुदेसाई (५.५/६) यांनी आपापल्या अपराजित राहून आपापल्या स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. अनिकेत रेडीज, यश गोगटे यांनी आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ केला.
महिला गट : प्रथम क्रमांक – सई भूषण प्रभुदेसाई, द्वितीय क्रमांक – तनया आंब्रे, तृतीय क्रमांक – मृणाल कुंभार, चतुर्थ क्रमांक – अदिती पाटील; उत्तेजनार्थ : सानवी दामले, आर्या पळसुलेदेसाई.
खुला गट : प्रथम क्रमांक – वरद पेठे, उपविजेता – यश गोगटे, तृतीय क्रमांक – अनिकेत रेडिज, चतुर्थ क्रमांक – निधी मुळे; उत्तेजनार्थ : अपूर्व बंडसोडे, आयुष रायकर, विहंग सावंत, सर्वोत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू – सुहास कामतेकर
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, शिर्के प्रशालेचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रायसोनी फौंडेशनकडून स्पर्धेला आर्थिक सहकार्य करण्यात आले होते. विवेक सोहनी व चैतन्य भिडे यांनी पंच म्हणून काम पहिले.


