मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाशैक्षणिक

सुमन विद्यालय व प्राथमिक शाळा टेरव येथे मोफत वह्या वाटप

बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट, मुंबई यांचा  प्रेरणादायी उपक्रम

चिपळूण : जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचालित सुमन विद्यालय टेरव या प्रशालेमध्ये नुकतेच बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रुझ, मुंबई यांच्यावतीने इयत्ता आठवी ते  इयत्ता दहावीच्या १०७ विद्यार्थ्यांना ७२० वह्यांचे तसेच जि. प. पूर्ण प्राथमिक मराठी शाळा टेरव क्रमांक १ शाळेत इयत्ता १ ली ते ७ वीच्या १३६ विद्यार्थ्यांना ९२४ वह्यांचे असे एकूण १६४४ वह्यांचे वाटप करण्यात आले.

वह्यांचे वितरण न्यासाचे अध्यक्ष नंदकुमार राणे, उपाध्यक्ष ओमप्रकाश सिंग, चिटणीस व  काडवली गावचे सुपुत्र नारायण चव्हाण यांनी केले. या प्रसंगी जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे सचिव योगेश कदम, संचालक तसेच सरस्वती कोचिंग क्लासेस, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट, मुंबईचे विश्वस्त व विशेष कार्यकारी अधिकारी सुधाकर कदम उपस्थित होते.
शिक्षणातील अडथळे दूर करून विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असून, न्यायाचा सेवाभाव समाजासाठी खरोखरच प्रेरणादायी ठरतो आहे. वरील न्यासाच्या वतीने आदिवासी पाड्यातील तसेच कोकण व महाराष्ट्रातील विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना निःशुल्क वह्या वाटप केले जाते. वह्या मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची आणि आत्मविश्वासाची झळक स्पष्ट दिसून आली.

बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्टच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे सुमन विद्यालय टेरव व जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा टेरव क्रमांक एक यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. न्यासाच्या सामाजिक बांधिलकीचा हा उज्ज्वल आदर्श भविष्यातही अनेक गरजू विद्यार्थ्यांचे जीवन उजळवेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी सरस्वती कोचिंग क्लासेस मुंबईचे संस्थापक तसेच जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अजित कदम त्याचप्रमाणे सुधाकर कदम यांनी विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक मंदार सुर्वे, दीपक मोने  तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!