रत्नागिरीतील जीजीपीएस शाळेचे क्रिकेट स्पर्धेत यश

रत्नागिरी : शालेय क्रिकेट स्पर्धा वर्ष २०२५-२६ मध्ये १४ वर्षांखालील वयोगटात जीजीपीएस शाळेच्या संघाने जिल्हास्तरावर बाजी मारत विभागीय स्तरावर दिमाखदारपणे प्रवेश केला. हातकणंगले (कोल्हापूर) येथे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी नुकत्याच पार पडलेल्या विभागीय स्तरावर जीजीपीएस संघाने दैदिप्यमान कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले.
प्रथम फलंदाजी करताना सिंधुदुर्ग संघासमोर ६ षटकांत १२५ धावांचे बलाढ्य आव्हान जीजीपीएसने ठेवले होते. यामध्ये देवांग गुरव नाबाद ६९ (२९ चेंडू), आराध्य मोंडकर २३ (८) आणि रुद्र पांढरे नाबाद २५ (१०) यांनी चमकदार फलंदाजी केली. प्रत्युत्तरात लक्ष्य गाठताना सिंधुदुर्ग संघाचा डाव अवघ्या ५७ धावांपर्यंतच मजल गाठू शकला.
जीजीपीएस शाळेच्या कारकिर्दीत प्रथमच जिल्हा आणि विभागीय स्तरावर क्रिकेट अजिंक्यपद प्राप्त झाल्याने शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक श्री. कदम, मुख्याध्यापिका सौ. पाटणकर, पर्यवेक्षक श्री. अकिवटे आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. क्रिकेट स्पर्धेचे पुढील सामने राज्यस्तरासाठी नाशिक २८ व २९ नोव्हेंबर रोजी खेळवले जातील.



