मुख्य बातमी

जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने तक्रारदारांचे प्रश्न तातडीने निकालात काढावेत

रत्नागिरी : लोकशाही दिनामध्ये बहुतांशी प्रश्न हे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाशी निगडीत असतात. हे प्रश्न तक्रारदार आणि संबंधित अधिकारी यांना आजच बोलावून घेवून तातडीने निकालात काढावेत. तक्रार घेवून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना क्षेत्रीय स्तरावरच संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारी सोडवून न्याय द्यायला हवा, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज झालेल्या लोकशाही दिनामध्ये जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी प्रलंबित अर्जांचा सर्वप्रथम आढावा घेतला. फेब्रुवारी महिन्यापासून प्रलंबित असणाऱ्या राजापूर तालुक्यातील कशेळी येथील साक्षी संतोष नाटेकर यांच्या अर्जावर ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी ही समस्या तातडीने सोडवायला हवी होती. आजच श्रीमती नाटेकर यांना कार्यालयात बोलवून संबंधित अधिकाऱ्यांनी ही समस्या तातडीने निकालात काढावी, अशी सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांना दिली.

अन्य तक्रार अर्जांबाबत संबंधित अधिकारी, गटविकास अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे उपलब्ध नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुढच्या लोकशाही दिनापासून संबंधित तक्रार अर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल घेवून सोबत यावे, असेही ते म्हणाले. तक्रार घेवून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना क्षेत्रीय स्तरावरच संबंधित अधिकाऱ्यांनी न्याय द्यायला हवा. त्यांना जिल्हास्तरावर यायला लागू नये. याची दक्षता सर्वांनीच घ्यायला हवी असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

यावेळी अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, समाजकल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे आदींसह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरील प्रातांधिकारी, तहसिलदार दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!