
रत्नागिरी : कोकण दर्शन या पर्यटन विषयक कार्यक्रमात संगमेश्वरवर आधारित दुसरा भाग २९ मे रोजी प्रसारित होणार आहे. संगमेश्वरच्या पहिल्या भागात कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वरी बोली आणि रामेश्वर पंचायतन याविषयी माहिती देण्यात आली होती.
संगमेश्वरचे अंतरंग उलगडणाऱ्या या दुसऱ्या भागामध्ये प्रसिद्ध देवस्थान श्री मार्लेश्वर, सात जलप्रवाहांचा संगम असणारे सप्तेश्वर, वैशिष्ट्यपूर्णरचना असणारे राजवाडी इथले सोमेश्वर मंदिर आणि बुरंबी इथले आगळे वेगळे असे काष्ठशिल्पदालन तसेच तेथील पक्षीप्रेमींना खुणावणारे पक्षीवैभव याविषयी या कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. हा कार्यक्रम २९ मे रोजी सकाळी ९.३० वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर प्रसारित होईल. या दोन्ही भागांसाठी निबंध कानिटकर, सोनाली कानिटकर, श्रीनिवास पेंडसे, सतीश कामत आणि दिलीप म्हैसकर यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे लेखन सोनाली सावंत यांनी केले असून निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचा आहे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे हे आहेत.
मध्यम लहरी ११४३ किलो हर्ट्स तसेच १०१.५ दशांश मेगाहर्टझ या एफ. एम. वाहिनीवर आणि newsonair या लाईव्ह मोबाईल अँपवर हा कार्यक्रम ऐकायला मिळणार आहे. प्रसारणानंतर एआयआर रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. सर्व रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले
आहे.



