लांजा येथे विकसित भारत संकल्प अभियानअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

रत्नागिरी : विकसित भारत संकल्प अभियान अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, लांजा, रिलायन्स फाउंडेशन, कृषी विभाग, आत्मा व भारतीय कृषी अनुसंधान परिषद (नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप भात लागवडीसंदर्भात २९ मे रोजी पुनस, वीरगाव व देवधे येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र, देवधे (लांजा) येथील डॉ. महेश महाले यांनी शेतकर्यांना विकसित भारत संकल्प अभियानाचे महत्त्व पटवून देऊन, भात बिजप्रक्रिया, सुधारीत लागवड पद्धत तसेच खताचा संतुलित वापर या बद्दल माहिती दिली. तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) यांनी निर्मित केलेल्या रत्नागिरी ८ व रत्नागिरी ६ इतर वाणांबद्दल माहिती दिली. डॉ. वैभव येवले यांनी विद्यापीठाने विकसित केलेले विविध अँड्रॉइड ॲपची माहिती दिली.

याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर रत्नागिरी ६ बियाणांचे वितरण करण्यात आले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, अंतर्गत केंद्रीय मात्स्यीकी शिक्षा संस्थान मुंबईचे शास्त्रज्ञ डॉ. अंकुश कांबळे यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, तर डॉ. सौरव कुमार यांनी मत्स्य संपदा योजनेबद्दल उपस्थितांना माहिती दिली. लांजा तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी अभिजीत शेलार यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली, तर ‘आत्मा’च्या श्रीमती गौरी शेरे यांनी सेंद्रिय शेतीबद्दल माहिती दिली. रिलायन्स फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी पुनस व वीरगाव येथे ऑनलाईन भात शेतीशाळेचे कामाबद्दल माहिती दिली.

पुनस गावचे सरपंच संतोष लिंगायत यांनी विकसित भारत संकल्प अभियानाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास कृषी सहाय्यक विजय शेट्ये, निवृत्ती तायडे, पुनस गावचे प्रगतशील शेतकरी अविनाश धुमाळ, वीरगाव बचत गटाच्या रिद्धी मौर्य, दर्शना आग्रे, रिलायन्स फाउंडेशनचे गौरव जाधव उपस्थित होते. वीरगाव व पुनस गावातील शेतकरी बंधू , भगिनींनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमात सहभाग घेतला.



