चिपळूणमधील कळंबस्ते येथे गुरुवारी ‘देवराई’चा शुभारंभ

रत्नागिरी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उद्या (५ जून) चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते रेल्वे फाटक जवळ सकाळी ७ वाजता देवराई वृक्ष लागवडीचा शुभांरभ करण्यात येणार आहे. नागरिकांनी वृक्षलागवड व श्रमदानासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी केले आहे.
यावेळी १४९ प्रजातींच्या १ हजार २५२ वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. अत्याधिक कार्बन उत्सर्जनामुळे होणारी जागतिक तापमान वाढ आणि त्यातून होणारे अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, चक्रीवादळे इत्यादी स्वरूपातील वातावरणीय बदल ग्रामीण भागावर गंभीर परिणाम करीत आहेत. या पर्यावरणाच्या संकटाला तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाद्वारे वातावरणातील कर्बवायू शोषून घेणे आवश्यक आहे. यासाठी तसेच जैवविविधतेचे जतन करण्यासाठी देवराया व घनवने तयार करणे हा प्रभावी उपाय आहे. राज्यात मानवनिर्मित देवराया व घनवने तयार करण्यासाठी शासनाने वनीकरण क्षेत्रात अनुभव असणाऱ्या देवराई फाउंडेशन, पुणे या संस्थेद्वारे राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक मानवनिर्मित देवराई व घनवन तयार करण्यात येणार आहे. देवराई उभारण्यासाठी लागणारी तांत्रिक माहिती व रोपे देवराई फाउंडेशनमार्फत पुरवण्यात येणार आहेत.



