२५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन कोकण रेल्वेच्या टीमने प्रवाशाला परत केला

रत्नागिरी : काल (१ सप्टेंबर) घाईघाईत चिपळूण स्टेशनवर उतरताना एका प्रवाशाचा मोबाईल फोन रेल्वेतच राहिला. ही बाब त्या प्रवाशाच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ त्याने रेल्वेशी संपर्क साधला आणि फोन रेल्वेतच राहिल्याची माहिती दिली. त्यानंतर सावर्डा रेल्वेस्थानकावर या प्रवाशाची ओळख पटवून कोकण रेल्वेच्या टीमने २५ हजार रुपये किंमतीचा फोन प्रवाशाला परत केला.
संकेत संतोष कान्हेकर (रा. खोली क्रमांक २८८ तांबटवाडी कामथे जि. रत्नागिरी) हे १ सप्टेंबर रोजी ट्रेन क्रमांक ०११५३ या ट्रेनने प्रवास करत होते. त्यावेळी ट्रेनच्या गार्ड साईड जनरल कोचमध्ये त्यांचा फोन राहिला होता. ही ट्रेन सावर्डा स्टेशनवर येताच, एचसी – सचिन देशमाने आणि सीटी हिरालाल मीना उपस्थित होते. माहितीनुसार जनरल कोचची तपासणी करण्यात आली आणि मोबाईल सापडला. स्टेशन मास्टरने संकेत कान्हेकर यांना सावर्डा स्टेशनवर येण्यास सांगितले. श्री. कान्हेकर सावर्डा स्टेशनवर आले असता त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि सांगितले की ते ठाण्याहून चिपळूणला गार्ड साईड जनरल कोचमध्ये प्रवास करत होते आणि घाईघाईत चिपळूण स्टेशनवर उतरताना त्यांनी त्यांचा मोबाईल कोचमध्येच सोडला होता.
मोबाईल आणि ओळख पडताळणी केल्यानंतर रेल्वे प्रवाशी संकेत कान्हेकर यांना त्यांचा २५ हजार रुपये किंमतीचा VIVO V27 मोबाईल सुरक्षित ताब्यात देण्यात आला. प्रवाशाने कोकण रेल्वे आणि RPF चिपळूणचे आभार मानले.



