भावेश चव्हाणचे बारावी परीक्षेत दैदीप्यमान यश; मिळवले ९७.२० टक्के गुण

रत्नागिरी : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएससी) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत रत्नागिरीच्या सुपुत्राने आपली चमक दाखवली आहे. लातूर येथील संत तुकाराम नॅशनल कॉलेजचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी भावेश सुरेश चव्हाण याने ९७.२० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
मूळचा रत्नागिरीचा असलेल्या भावेशने आपल्या यशाचे श्रेय सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य नियोजनाला दिले आहे. अत्यंत कठिण समजल्या जाणाऱ्या बारावी विज्ञान शाखेत त्याने मिळवलेल्या या गुणांमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. भावेशने मिळवलेल्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या या जिद्दीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणाचा त्याचा मार्ग आता सुखकर झाला आहे.
भावेशच्या या यशाबद्दल त्याचे वडील सुरेश चव्हाण, आई सुरेखा चव्हाण, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोकणातील विद्यार्थ्याने लातूरमध्ये जाऊन मिळवलेल्या या यशामुळे सर्वच स्तरांतून त्याचे कौतुक केले जात आहे.


