खाकीचा धर्म पाळून एकोप्यासाठी प्रयत्न : नितीन बगाटे

रत्नागिरी : “आमचा धर्म खाकी हाच आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाताना एकोप्यासाठी प्रसंगी कठोर होऊन कर्तव्य करणार,” असे प्रतिपादन रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यांतर्गत सामाजिक सलोखा समिती सदस्यांचा परिचय बैठकीत केले.
पोलिस अधीक्षक श्री. बगाटे यांचा संकल्पनेतून जिल्ह्यात प्रत्येक पोलिस स्थानकांतर्गत सामाजिक सलोखा समिती स्थापन करण्यात येत आहेत. रत्नागिरी शहर पोलिस स्थानकांतर्गत समितीचा सदस्यांची येथील दैवज्ञ भवन येथे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक शिवप्रसाद पारवे, रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर आणि शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर उपस्थित होते. प्रारंभी पोलिस अधीक्षक श्री. बगाटे यांचा जयदीप परांजपे यांनी परिचय करून दिला. मनोगतात बगाटे म्हणाले की, “कोकणातील लोक प्रगल्भ, शांतताप्रिय आहेत. त्यामुळे बळाचा वापर करण्याची गरजच नाही. अशा शांततापूर्ण भागाला शांत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पोलिस आणि समाज यातील दरी दूर व्हावी या उद्देशाने सामाजिक सलोखा समिती स्थापन करण्यात येत आहेत.”
सोशल मीडियावरून वार केले जात आहेत. त्यातून सामाजिक एकोप्याला धोका पोहोचत आहे; मात्र खाकीचा धर्म पाळून प्रसंगी कठोर होऊन कर्तव्य करू, असेही श्री. बगाटे यावेळी म्हणाले.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी केले. सूत्रसंचालन पूर्व पेठे यांनी केले. यावेळी पोलिस पाटील, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा एनएसएस विभागाचे विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.



