रा. भा. शिर्के प्रशालेत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ साजरा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये रा. भा. शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. प्रशालेच्या ५ वीच्या वर्गाचा एकूण निकाल ६३.०७ टक्के तर ८वीच्या वर्गाचा निकाल ४८.२१ टक्के लागला आहे. या परीक्षेमध्ये प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
इयत्ता पाचवीच्या परीक्षेत एकूण ६६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आर्या विशाल मोरे (क्र. ८), दुर्वा संतोष शिंदे (क्र. १७), अनुज मनोज कांबळे (क्र. ७२), रोहन अमर घोसाळकर (क्र. ७५) आणि नियती विपिन सावंत (क्र. १११) हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. त्यांना विभाग प्रमुख टी. जे. यादव, एस. वाय. कुवर, वाय. एस. महाले आणि ए. आर. आखाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता आठवीच्या परीक्षेत एकूण ५७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २७ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. वेदी उमेश बंदरकर (क्र. १९), अर्णव मंगेश पानगले (क्र. २१), दिया प्रशांत परब (क्र. ५१), चिन्मय प्रकाश रावणंग (क्र. ५५), उर्वी समीर गोताड (क्र. ५७), मुग्धा राजेंद्र यादव (क्र. ५८), साई सतीश नेवरेकर (क्र. ६९), आणि आर्य गुरुप्रसाद जोशी (क्र. ९५) हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले.
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख एस. डी. साखळकर, एस. के. कांबळे, ए. एन. अभ्यंकर, एस. एस. पांढरे, पी. सी. जाधव व पी. एम. पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
वेदी उमेश बंदरकर, उर्वी समीर गोताड, स्वरा मंगेश पुसाळकर आणि विरेश विलास चौगुले हे एनएमएमएस शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी ठरले. या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख श्री. भेलेकर, सौ. अभ्यंकर, श्री. पडवेकर, श्री. पाटील, सौ. गावित, श्री. मुंडेकर, श्री. नवरे, सौ. करकरे, श्री. निवळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच एनसीसीमध्ये प्रेम पाटील याला बेस्ट कॅडेट अवॉर्ड प्राप्त झाला. या विद्यार्थ्याला एनसीसी ऑफिसर श्री. गद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र दादा चव्हाण, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे आणि रत्नागिरी भाजप पदवीधर सेलतर्फे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रा. भा. शिर्के प्रशालेतील शिक्षिका स्नेहा दुदगीकर यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्यांचेही गुणगौरव कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनंदन करण्यात आले.
या सर्व विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष ॲड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, कनिष्ठ महाविद्यालय शालेय समिती अध्यक्ष मनोज पाटणकर, नियामक मंडळ सदस्य सचिन वहाळकर, संतोष गुरव यांच्या हस्ते भेटवस्तू आणि गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे यांनी केले. त्यांनी मान्यवरांचे स्वागत करून सर्व परीक्षांच्या कार्यपद्धतीविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेदी बंदरकर, अर्णव पानगले, स्वरा पुसाळकर, मुग्धा यादव, आर्या मोरे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे आम्हाला शिष्यवृत्ती प्राप्त झाली असे सांगितले. मार्गदर्शक शिक्षिका सौ. साखळकर यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी घेतलेली मेहनत आणि शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन याबद्दल सांगितले.
र. ए. सोसायटीचे उपकार्याध्यक्ष ॲड. साखळकर यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती पटवर्धन यांनी मनोगत व्यक्त करताना पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एस. पडवेकर आणि आभार प्रदर्शन श्री. पांढरे यांनी केले.



