रत्नागिरी शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या निकालात रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील आणि युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
या यशाचे कौतुक करताना जिल्हाप्रमुख दत्ता कदम म्हणाले की, “बारावीचा टप्पा पार करून विद्यार्थी आता उच्च शिक्षणाच्या उंबरठ्यावर आहेत. रत्नागिरीच्या मातीने नेहमीच गुणवंत विद्यार्थी दिले आहेत आणि या निकालाने पुन्हा एकदा ते सिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या जिद्दीचे प्रतीक आहे.”
तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांनीही तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या यशावर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, “अत्यंत कष्टाने आणि सातत्याने अभ्यास करून विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. तालुक्यातील प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याचा आम्हाला अभिमान आहे.”
युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. युवासेनेच्या वतीने आम्ही या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. हे यश तुमच्या पुढील आयुष्यातील मोठ्या स्वप्नांच्या दिशेने टाकलेले पहिले यशस्वी पाऊल आहे. पुढील वाटचालीस आमचा पूर्ण पाठिंबा राहील.”
ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही, त्यांनी निराश न होता पुन्हा एकदा आत्मविश्वासाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिवसेना आणि युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.


