राजापुरात गोवा बनावटीच्या दारूविक्रीविरोधात अभिजीत गुरव आक्रमक
कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीचा इशारा

राजापूर : शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या अवैध दारूविक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून अनेकांचे जीव धोक्यात येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पोलिसांच्या नजरेसमोर हे प्रकार सुरू असतानाही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा राजापूर पंचायत समितीचे उपसभापती अभिजीत गुरव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. येत्या पंधरा दिवसांत गोवा बनावटीची दारूविक्री पूर्णपणे बंद न झाल्यास थेट राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
राजापूर शहर व तालुक्यातील अवैध दारूविक्रीविरोधात श्री. गुरव यांनी धडक मोहीम सुरू केली असून दोन दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः पोलिसांसमवेत काही ठिकाणी धाड टाकल्याचे सांगितले. तसेच बुधवारी झालेल्या जनता दरबारातही गोवा बनावटीच्या दारूविक्रीचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे सध्या हा विषय राजापुरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. गुरव यांनी, “गोवा बनावटीच्या दारूच्या आहारी जाऊन राजापुरातील अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. काहींना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे अशा अवैध दारूधंद्यांचे समूळ उच्चाटन होणे अत्यावश्यक आहे,” असे स्पष्ट केले.
राजापूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये खुलेआम गोवा बनावटीची दारू विकली जात असून पोलिस प्रशासनाचा कोणताही धाक उरलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला. “पोलीस कारवाईसाठी गेल्यानंतर काही दारूविक्रेते एका मोठ्या लोकप्रतिनिधीचे नाव पुढे करून पोलिसांनाच दबाव टाकतात. मग या अवैध धंद्यांमागे नेमका कोणाचा वरदहस्त आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राजापूर तालुका अवैध दारूविक्रीमुक्त करण्यासाठी आपण व्यापक जनआंदोलन उभारणार असल्याचे सांगत, येत्या पंधरा दिवसांत पोलिसांनी ठोस कारवाई करून हे धंदे कायमस्वरूपी बंद न केल्यास थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिकृत तक्रार करण्यात येईल, असा इशाराही श्री. गुरव यांनी दिला.


