डंपर- दुचाकीच्या धडकेत तरुण ठार; एक जखमी

रत्नागिरी : शहरात आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास चर्मालयजवळ डंपर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून, त्याच्याबरोबर असलेला तरुण जखमी झाला आहे. महेश घडशी (वय २१, रा. शिरगाव तिवेंडेवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा मित्र ओंकार सनगरे (वय २२) गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
<span;>महेश आणि ओंकार हे दोघे मित्र दुचाकीवरून डीमार्ट येथे खरेदी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव वेगातील डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी ओंकारला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, डंपर चालकाचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. महेशच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरात वाढणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


