क्रीडामुख्य बातमी

राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेत डॉ. हजिरनीस संघाला विजेतेपद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त व असोसिएशनचे दिवंगत अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष देव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी झाले. स्पर्धेत गोल्डन ग्रुपमध्ये डॉ. हजिरनिस यांच्या टीमने विजेतेपद पटकावले. तर सिल्व्हर ग्रुपमध्ये बोरिवली स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद मिळवले.

साळवी स्टॉप येथील नक्षत्र हॉलमध्ये दोन दिवस या स्पर्धा झाल्या. गोल्डन ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक डॉ. हजिरनीस, आर श्रीधरन, पी. हेगडे, आर. गुळवणी व बी. जी. दक्षिणदास यांच्या संघाने मिळवला. द्वितीय हेमंत पांडे व सहकाऱ्यांच्या डॅझन संघाने, तृतीय अनिरुद्ध संझगिरी यांच्या फ्रेनमेस, चौथा श्री. वरसले यांच्या जाम संघाने, पाचवा क्रमांक जे. के. भोसले यांच्या अमनोरा संघाने आणि सहावा क्रमांक रत्नागिरीच्या मोहन दामले, अभय पटवर्धन, माधव आगाशे व अभय लेले यांच्या श्री मॅंगो संघाने मिळवला. सिल्व्हर ग्रुपमध्ये एस. बी. खानोलकर यांच्या बोरिवली स्पोर्ट्स क्लबने प्रथम, द्वितीय संजय वैद्य यांच्या गणेश, सांगली संघाने, तृतीय क्रमांक श्री. देशमुख यांच्या पल्स ग्रुपने मिळवला.

या स्पर्धेकरिता भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष व डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेत मुंबई, गोवा, पुणे, बेळगाव, कोल्हापूर, राजापूर, देवगड, सावंतवाडी व यजमान रत्नागिरीमधील २१ संघ सहभागी झाले. स्पर्धा संचालक म्हणून दक्षिण दास आणि राजीव देव यांनी काम पाहिले.

पहिल्या दिवशी डुप्लिकेट ब्रिजच्या प्रत्येकी ८ बोर्डाच्या सहा फेऱ्या खेळवल्या गेल्या. यामधून गोल्डन ग्रुपसाठी संघ निवड करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पात्र संघांमध्ये ऑल टू प्ले ऑल या पध्दतीने सामने झाले व त्यातून विजेते जाहीर करण्यात आले. राहिलेल्या संघांमधून लीग मॅच खेळवून त्यातून तीन विजेते काढले. स्पर्धेचे बक्षीस जिल्हा ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दामले यांच्या हस्ते झाले. विजेत्यांना पन्नास हजार रुपयांची बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रत्नागिरी ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दामले, सचिव सचिन जोशी, स्पर्धा कमिटीतील अभय लेले, चिंतामणी दामले, सचिन मुळे, विनायक मुळे यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!