मुख्य बातमी

उद्योगपती रवींद्र प्रभुदेसाई यांचा रविवारी रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे होणार सत्कार

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे उद्योगपती, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र वामन प्रभुदेसाई यांचा विशेष सत्कार येत्या रविवारी (२२ जून) करण्यात येणार आहे.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने (पुणे) डी. लिट. (डॉक्टरेट) पदवी प्रदान करून श्री. प्रभुदेसाई यांना सन्मानित केले. या सन्मानाचा आनंद साजरा करण्यासाठी रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे त्यांचा रविवारी दुपारी ४.३० वाजता शेरे नाका येथील संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात गौरव करण्यात येणार आहे. याप्रसंगी गौरवमूर्तीच्या हस्ते ‘कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास’ (पाचवी आवृत्ती) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

उद्योगपती रवींद्र प्रभुदेसाई यांना वडिलांकडून उद्योजकीय वारसा मिळाला. त्यांनी पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि कंपनीची स्थापना केली. त्यांनी कंपनीद्वारे ११ विभागात नाविन्यपूर्ण उत्पादने तसेच कृषी पर्यटन सुरू केले. कंपनी आयएसओ मानांकन प्राप्त आहे. भारतात सर्वत्र आणि २६ परदेशांतही पितांबरीची उत्पादने उपलब्ध आहेत. त्यांना यापूर्वी यशस्वी उद्योजक पुरस्कार, उद्योग श्री पुरस्कार, कोकण आयडॉल, इंडियाज ग्रेटेस्ट ब्रॅंड्स, कऱ्हाडे भूषण पुरस्कार आदी ३५ हून अधिक पुरस्कार लाभले आहेत. त्यांनी सुगंधी गवताच्या उत्पादनातून कोकणातल्या शेतकऱ्यांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध व्हावं यासाठी सुगंधी व समृद्ध कोकण विकास मंच या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेने राजापूर तालुक्यातील तळवडे, ताम्हाणे गावे दत्तक घेतली आहेत. अ. भा. ब्राह्मण संघ, विश्व हिंदू परिषद, कोकण भूमी प्रतिष्ठान, सॅटर्डे क्लब आदी दहाहून अधिक संस्थांमध्ये ते पदाधिकारी आहेत.

कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास पुस्तकाची पाचवी आवृत्ती

कर्‍हाडे ब्राह्मणांचा इतिहास या पुस्तकाचे लेखन (कै.) विष्णू वासुदेव आठल्ये (शिपोशी) यांनी केले आहे. या पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन १९४७ मध्ये झाले होते. पुस्तकाची वाढती मागणी लक्षात घेता यावर्षी पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात कर्‍हाडे ब्राह्मणांविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. कर्‍हाडे ब्राह्मणांचे कोकणात आगमन कसे झाले ते कोकणात कसे स्थायिक झाले, याविषयी माहिती देण्यात आली आहे. पाचव्या आवृत्तीत आम्ही ज्ञातीबांधवांची आडनावे, गोत्रे, कुलदैवत, कुलदेवता व त्यांचे ठिकाण ही माहिती समाविष्ट केली आहे.

या कार्यक्रमाला कऱ्हाडे ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर आणि उपाध्यक्ष मानस देसाई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!