Uncategorized

जाकादेवी विद्यालयाच्या सर्वेश मायंगडे विद्यार्थ्याची धाडसी कामगिरी; चोराला पकडण्यात मोलाची भूमिका

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून पाच हजारांचे बक्षीस

रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या तरवळ येथील सर्वेश संदेश मायंगडे या विद्यार्थ्याने धाडस, प्रसंगावधान आणि चातुर्य दाखवत चोरी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या धाडसी कामगिरीमुळे सर्वेशचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सर्वेशची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तीन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांना लखवा आला असून आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. सर्वेश हा घरातील मोठा मुलगा आहे. आर्थिक अडचणींमुळे शाळेचा गणवेश घेणेही कठीण झाले होते. मात्र, ज्यांच्या घरात चोरी झाली होती त्या कुटुंबाने त्याच्या धाडसी कामगिरीबद्दल कौतुक म्हणून त्याला शाळेचा नवीन गणवेश भेट दिला.

एप्रिल महिन्यात चादरी विक्रीच्या निमित्ताने गावात फिरणाऱ्या एका व्यक्तीने परिसराची पाहणी करून दुसऱ्या दिवशी चोरीचा डाव आखला. तरवळ मायंगडेवाडी येथील एका घरात चोरी सुरू असल्याचे सर्वेशच्या निदर्शनास आले. त्याने तत्काळ आपल्या मोबाईलवर संशयिताचे चित्रीकरण केले आणि घरमालकाला याची माहिती दिली.

यानंतर सर्वेशने घरमालकासह मोटारसायकलवरून आरोपीचा पाठलाग केला. निवळी परिसरात आरोपीला गाठल्यानंतर त्याच्याशी संवाद साधत प्रसंगावधान राखले. आरोपी हातखंबा येथे जात असल्याचे सांगताच सर्वेश स्वतः त्याच्या मोटारसायकलवर बसला. काही अंतर गेल्यानंतर आरोपीने सर्वेशला गाडीवरून ढकलून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वेशने धैर्य न गमावता हातखंबा येथील ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली व मोबाईलमधील चित्रीकरणासह महत्त्वाचे पुरावे उपलब्ध करून दिले.

या प्रकरणात आरोपीने दोन घरांतून सुमारे ४३ हजार रुपयांची रोकड चोरल्याचे निष्पन्न झाले. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला अटक केली.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या हस्ते सर्वेश मायंगडे याचा प्रशस्तीपत्र व ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील मयेकर व मुख्याध्यापक नितीन मोरे सर्व शिक्षक वर्गाने त्याचे कौतुक केले आहे. विद्यार्थी दशेत दाखविलेल्या या धाडसी कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून सर्वेश मायंगडे याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!