डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चिपळूण या वसतिगृहात प्रवेशास पात्र इच्छुक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज अथवा ऑफलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चिपळूणचे प्रभारी गृहपाल रवींद्र कुमठेकर यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरता शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चिपळूण हे कापसाळ, (ता. चिपळूण) येथील भाडेतत्वावरील इमारतीमध्ये चालू करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आठवीपासून पुढे शिकणाऱ्या, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, बिगरव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांत शिकणाऱ्या व स्थानिक नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. वसतिगृहात प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रचलित शासन निर्णयानुसार निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, गणवेश व इतर शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात.
वसतिगृहाची मान्य क्षमता ७५ असून प्रवेशासाठी सामाजिक आरक्षणाची टक्केवारी अनुसूचित जाती ८५ टक्के, अनुसूचित जमाती तीन टक्के, विमुक्त जाती भटक्या जमाती पाच टक्के, आर्थिकदृष्टया मागास व इतर प्रवर्गासाठी पाच टक्के, विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के शासनाने निर्धारीत केलेली आहे. तसेच, दिव्यांग व अनाथ आरक्षणसाठी एकूण समांतर आरक्षण धोरणानुसार उक्त नमूद सर्व प्रवर्गामध्ये पाच टक्के जागांवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व एक टक्का जागांवर अनाथ विद्यार्थ्यांसाठी समांतर आरक्षण लागू राहील.
वसतिगृहात प्रवेशासाठी इच्छुक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी hmas.mahait.org या संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज अथवा वसतिगृहाचे गृहपाल यांच्याकडे ऑफलाईन अर्ज त्यासोबतच्या आवश्यक कागदपत्रांसह यांच्याकडे सादर करावेत.


